अमिताभ बच्चन हे १९९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेते. अजूनही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्याकाळी ते अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जायचे. अमिताभ बच्चन यांचा १९९१ रोजी ‘हम’ हा चित्रपट आला होता. अॅक्शन सीन असलेल्या या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची वेगळीच छबी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट ‘टार्गेट’ या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये अमिताभ यांच्यासह रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, शिल्पा शिरोडकर, अनुपम खेर यांसारखे कलाकार झळकले होते. या चित्रपटातील कामासाठी अमिताभ यांना त्यावेळचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
‘हम’ मधील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेला तर चांगला प्रतिसाद मिळालच होता, पण यातील ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणं त्याकाळी चांगलंच गाजलं होतं, यामुळे तरुणांमध्ये अमिताभ बच्चन यांची क्रेझ निर्माण झाली. ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणं आनंद बक्शी यांनी लिहिलं होतं, तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी याला संगीत दिलं होतं; आणि कविता कृष्णमूर्ती व सुदेश भोसले यांनी हे गाणं गायलं होतं. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की त्याकाळी अनेक लग्नांमध्ये, कल्बमध्ये यांसारख्या ठिकणी वाजवलं जायचं. पण, हे गाणं जितकं प्रसिद्ध झालं तितकेच यासाठी कष्ट घेण्यात आले होते. या गाण्याचे गायक सुदेश भोसले यांनी या गाण्यादरम्यानचा किस्सा सांगितला आहे.
‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्यादरम्यानचा किस्सा सांगताना सुदेश भोसले म्हणाले, “या गाण्यामध्ये ओ री ओ जुम्मा, मेरी जाने मन बाहर निकल असे संवाद होते आणि त्यानंतर मला पुन्हा गाणं गायचं होतं, त्यामुळे हे गाणं गाणे माझ्यासाठी खूप कठीण गेलं. पण, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना तसंच हवं होतं, म्हणून मी त्यांना अपेक्षित असं गाणं गाण्याचा प्रयत्न केला.” सुदेश भोसले पुढे म्हणाले, “त्याकाळी अशी गाणी गाण्यासाठी दोन दिवस जायचे. आम्ही या गाण्याचं रेकॉर्डिंग सकाळी ९ वाजता सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता या गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं. त्याकाळी गाणी रेकॉर्ड करायला दोन दिवस लागायचे.” यावेळी सुदेश यांनी असंही सांगितलं की, हे गाणं गाताना ते थोडे घाबरले होते आणि गाणं रेकॉर्ड करताना जवळपास १७ तास उपाशी राहिले होते. पण, यावेळी ते तब्बल २५ कप चहा प्यायले होते, ज्यामुळे त्यांना अॅसिडिटी झाली होती.”
‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणं ९०च्या काळातील गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. सुदेश भोसले यांनी गाणं गाण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं चिज झालं हे या गाण्याच्या लोकप्रियतेवरून कळतं आणि हे अमिताभ यांच्या प्रसिद्ध गाण्यांपैकी एक आहे. चित्रपटाला ३४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.