Amrita Rao Was Getting Marriage Proposal’s After Vivah : बॉलीवूडमधील असे काही सिनेमे आहेत, ज्यांची क्रेझ आजही कायम आहे आणि त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. असे सिनेमे जे प्रेक्षकांनी असंख्य वेळा पाहिले असतील, त्यातलाच एक म्हणजे अभिनेता शाहिद कपूर व अमृता राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘विवाह’ हा सिनेमा. या सिनेमाची गोष्ट तर निराळी आहेच; पण यातील या दोघांच्या केमिस्ट्रीनेही विशेष लक्षं वेधलं होतं.
अमृता रावचा सहजसुंदर अभिनय आणि तिचं सौंदर्य या गोष्टींवर लाखो लोक जणू फिदा झाले होते. आजही यामधील तिचे सीन सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच नुकतीच अभिनेत्रीनं एक मुलाखत दिली आहे. अमृताने रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना ‘विवाह’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला आलेल्या अनुभवांबद्दलची माहिती दिली आहे. ती म्हणाली, ” ‘विवाह’नंतर मला अनेक एनआरआय यांची स्थळं यायची. लोक माझ्या घराखाली गाडी घेऊन उभे असायचे आणि माझ्याशी लग्न कर, असं म्हणायचे. एक-दोन नाही, तर मला अशी अनेक स्थळं आली होती. त्यावेळी मी हे बघून हसायचे आणि वाटायचं की, कशी माणसं आहेत ही”.
अमृता रावला आलेलं रक्ताने लिहिलेलं पत्र
अमृता याबद्दल पुढे म्हणाली, “काही लोकांनी तर पत्रंही लिहिली होती. एकदा तर मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलेलं आणि तेव्हा मला खूप भीती वाटलेली. एक मुलगा होता, जो टेलिफोन बूथजवळ उभा असायचा माझ्या घराबाहेर आणि माझे आई किंवा बाबा फोन उचलायचे.” अमृतानं पुढे तिची तिच्या नवऱ्याबरोबर कशी भेट झाली याबद्दल सांगितलं आहे. तिनं सांगितलं की, तिची व तिचा नवरा आरजे अमोलची भेट झाली तेव्हा ती तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात होती. ती अनेक मोठ्या चित्रपटांतून झळकत होती; पण त्यादरम्यान तिला हव्या तशा भूमिकांसाठी विचारणा होत नव्हती.
अमृता त्याबद्दल म्हणाली, “मला जसे चित्रपट करायचे होते, तशा चित्रपटांसाठी मला विचारलं जात नव्हतं. मोठ्या ऑफर यायच्या; पण त्यात काहीतरी अटी असायच्या. जसं की, एखादा किसिंग सीन आहे वगैरे तेव्हा मला वाटायचं की, मला फक्त अशा ऑफरच का येतात, ज्यामध्ये काहीतरी अडचणी असतातच? मी खचून जावं म्हणून लोक खूप काय काय बोलायचे. मला पार्ट्यांना, पुरस्कार सोहळ्यांना जायला आवडायचं नाही. मला फक्त माझं काम करायचं होतं आणि त्यानंतर घरी जायचं होतं. मी त्यावेळी खूप एकटी पडले होते.”
दरम्यान, अमृता सध्या चर्चेत आहे, ते तिच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटामुळे. त्यामध्ये ती संध्या त्यागी या भूमिकेत पाहायला मिळत आहे. परंतु, यामध्ये तिला स्क्रीन टाईम खूपच कमी असल्यानं तिच्या चाहत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून, ते तिला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.