Anees Bazmee on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्यामध्ये काही गंभीर, तर काही विनोदी धाटणीच्या भूमिका पाहायला मिळाल्या.
वेलकम या चित्रपटातील त्यांची उदय शेट्टी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांचा कंट्रोल उदय कंट्रोल हा डायलॉग आजही लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील उदय शेट्टी आणि मजनूभाई या भूमिकांनी धुमाकूळ घातला होता. मात्र, तिरंगा, क्रांतीवीर यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकरांना या भूमिकेसाठी कसे तयार केले, याबद्दल दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी खुलासा केला होता.
नाना पाटेकर दिग्दर्शकाला म्हणालेले…
अनीस बज्मी यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नाना पाटेकरांना या भूमिकेसाठी कसे तयार केले, याबद्दल वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “मी नाना पाटेकरांच्या कामाचा खूप मोठा चाहता होतो. पण, मला माहीत होते की, गंभीर भूमिका करणाऱ्या या कलाकारामध्ये विनोदी भूमिका करण्याचेही सामर्थ्य आहे. मला असे वाटत होते, ते ज्या दिवशी विनोदी भूमिका करतील, त्यावेळी ते अदभुत असेल.”
जेव्हा भूमिकेसाठी विचारणा करण्यासाठी अनीस बज्मी यांनी नाना पाटेकरांना फोन केला. त्या वेळचा किस्सा त्यांनी सांगितला होता. ते म्हणालेले, “मी त्यांना म्हणालो की, मला तुम्हाला भेटायचे आहे. त्यावेळी ते म्हणाले की कशाला? जेव्हा मी त्यांना माझ्याकडे एका चित्रपटाची स्क्रिप्ट आहे, असे सांगितले. तेव्हा ते कथा ऐकण्यास उत्सुक नसल्याचे दिसले.” असे असले तरी अनीस बज्मींनी हार मानली नाही. ते नाना पाटेकरांना प्रत्यक्षात भेटण्यासाठी गेले.
अनीज बज्मी पुढे म्हणाले, “त्यांनी मला सांगितले की, मला गोष्ट ऐकायची नाही. तू तुझ्या आईची शपथ घे आणि सांग की, हा चित्रपट माझ्यासाठी चांगला आहे आणि मी तो केला पाहिजे. मला अशी शपथ चित्रपटासाठी घ्यायची नव्हती. मी त्यांना गोष्ट ऐकण्यास तयार केले. त्यांना मी ३ तास, ३० मिनिटं व ३ मिनिटं, अशा ऑफर दिल्या. त्यातील त्यांनी ३ तासांची ऑफर स्वीकारली.”
“संपूर्ण कथा ऐकल्यानंतर नाना उठले आणि त्यांनी मिठी मारली. ते म्हणालेले की, अनीस हे बघ. मी ओली माती आहे. जेव्हा मी तुझ्या सेटवर येईन तेव्हा तुला जसा मला आकार द्यायचा आहे, तो दे. नानांबरोबर काम करणे अवघड असल्याचे अनेक जण म्हणतात. पण, नाना हे सर्वांत जास्त कामाप्रति समर्पित असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत.”
दरम्यान, वेलकम टू द जंगल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर- अनिल कपूर ही लोकप्रिय जोडी नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
