दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. राजेश खन्ना यांना व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळालं, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना संघर्ष करावा लागला. राजेश खन्ना यांनी वयाच्या ३० व्या वर्षी १५ वर्षांच्या डिंपल कपाडियांशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा आला आणि ते वेगळे राहू लागले.

राजेश खन्ना व डिंपल वेगळे झाले, पण त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. डिंपलपासून वेगळे राहत असलेल्या राजेश खन्नांच्या आयुष्यात नंतर अभिनेत्री अनिता अडवाणी आली. राजेश यांच्या करिअरला उतरती कळा लागली तेव्हा अनिता त्यांच्याबरोबर होती. अनिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्नांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. ४५ लाख रुपयांच्या थकीत करांवरून राजेश खन्ना यांचा एकदा आयकर अधिकाऱ्याशी वाद झाला होता, ते अनिताने सांगितलं.

मेरी सहेली या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनिताने राजेश यांचे घर सील करण्यात आले होते आणि ते ऑफिसमध्ये राहत होता अशा अफवांवर स्पष्टीकरण दिलं. “राजेश खन्ना यांचे घर सील करण्यात आले होते आणि ते त्यांच्या ऑफिसमध्ये राहत होते, अशा गोष्टी करताना मी लोकांना ऐकलं होतं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे; त्यांचं घर कधीही सील करण्यात आलं नव्हतं आणि ते कधीही त्यांच्या ऑफिसमध्ये राहिले नव्हते. १९९१ मध्ये आयकराशी संबंधित एक समस्या झाली होती,” असं अनिता म्हणाली.

राजेश खन्ना यांना आयकरबद्दल माहीत नव्हतं- अनिता

अनिता पुढे म्हणाली, “ते (राजेश खन्ना) कधीही कागदपत्रे पाहायचे नाहीत, त्यामुळे त्यांना आयकर म्हणजे काय हे माहीत नव्हतं. त्यांची टीम त्यांना जितके पैसे द्यायला सांगायची, तेवढे ते द्यायचे. जर त्यांना एक लाख मागितले असेल, तर त्यांच्या सीएला फोन करून विचारायचे की त्यात किती शून्य येतात. नंतर टॅक्सची थकबाकी झाली. त्यांनी आणि त्यांच्या टीमने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना कर थकलाय हेही माहित नव्हतं. त्यांना चार्टर्ड अकाउंटन्सीबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि अचानक त्यांना ४५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले.”

आयकर अधिकाऱ्याने दिलेली धमकी

टॅक्स थकबाकीसंदर्भात नोटीस आल्यावर राजेश खन्ना स्वतः कर आयकर अधिकाऱ्याला भेटायला गेले होते. “त्यांचे एका आयकर अधिकाऱ्याशी भांडण झाले होते. ते त्यांना स्वतः भेटायला गेले होते. त्या अधिकाऱ्याने त्यांना धमकी दिली की ते त्यांचे घर सील करतील आणि त्यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,” असं अनिताने सांगितलं. त्यानंतर राजेश खन्नांनी ती थकबाकी भरली आणि त्यांचं घर कधीच सील झालं नाही.

या मुलाखतीत अनिता अडवाणीने राजेश खन्ना यांच्याशी खासगी समारंभात लग्न केल्याचाही दावा केला. “आमच्या घरी एक लहान मंदिर होते. मी काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेतले होते. त्यांनी ते माझ्या गळ्यात घातले. माझ्या भांगेत कुंकू भरले आणि म्हणाले, ‘आजपासून तू माझी जबाबदारी आहेस.’ अशा रितीने एका रात्री आमचे लग्न झाले होते,” असं अनिता अडवाणी म्हणाली.