रोजच्या जीवनात विविध कारणांनी आपली अनेक व्यक्तींशी भांडणे आणि वाद होत असतात. अनेकदा मन दुखावले गेल्याने व्यक्ती वर्षानुवर्षे अबोला धरतात. आता असंच काहीसं ‘मुल्क’, ‘थप्पड़’, ‘आर्टिकल १५’, ‘भीड’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याबरोबरही घडलं आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने या दिग्दर्शकांशी गेली १८ वर्षे अबोला धरल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी नुकतीच ‘द लल्लनटॉप’ला हजेरी लावली होती. येथे मुलाखतीमध्ये त्यांनी अजय देवगणबद्दल भाष्य केलं आहे. २००७ मध्ये अनुभव सिन्हा यांचा ‘कॅश’ चित्रपट आला होता. यामध्ये अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा एक मल्टी स्टारर चित्रपट होता. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तेव्हापासून अजय देवगण आणि अनुभव सिन्हा यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या सर्व चर्चांवर पडदा टाकत अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

“आमच्यामध्ये कधीच कोणतंही भांडण झालेलं नाही. तो माझ्याबरोबर अजिबात संवाद साधत नाही, याचं कारण काय तेही मला माहिती नाही. ‘कॅश’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर आम्ही एकदाही भेटलो नाही”, असं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.

अनुभव सिन्हा यांनी काहीवेळा स्वत:हून अजय देवगणबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. ते पुढे म्हणाले, “मी स्वत: एक-दोन वेळा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कधीच एकही रिप्लाय केला नाही. मला वाटले कदाचित त्याने माझा मेसेज पाहिला नसेल किंवा त्याचं लक्ष गेलं नसेल. काही असो, पण आम्ही एकमेकांशी बोलून आता तब्बल १८ वर्षे झाली आहेत.”

चित्रपटात काम करताना अजयचे अन्य कुणाशी मतभेद झाले होते का? असा प्रश्न पुढे त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनुभव सिन्हा म्हणाले, “आमच्या दोघांमध्ये कधीही कोणत्याही मुद्द्यावरून मतभेद झाले नाहीत. निर्माता आणि फायनान्सर या दोघांमध्ये मतभेद होते, मी या दोघांपैकी एकही नव्हतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतभेदाबद्दल आणखी आठवण सांगत अनुभव सिन्हा पुढे म्हणाले, “एकदा मी लोकांच्या राजकीय विचारांबद्दल बोललो होतो, त्यावेळी कदाचित मी अजयवरसुद्धा बोललो असेल. मात्र, मी फक्त त्याच्याशी या विषयावर बोललो नव्हतो. ज्या इतर व्यक्तींना मी हे बोललो होतो, त्यांच्याशी आद्यापही माझे चांगले संबंध आहेत.”