लोकप्रिय पंजाबी अभिनेता व गायक दिलजीत दोसांझने त्याच्या ‘सरदारजी ३’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला मुख्य अभिनेत्री म्हणून घेतलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही हानिया आमिरला या चित्रपटात कास्ट केल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती. त्याबद्दल दिलजीतला नेटकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळींच्या रोषाला सामोरे जावे लागले.
अशातच आता त्याच्यावर अभिनेते अनुपम खेर यांनीही टीका केली आहे. सध्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेले अनुपम खेर यांनी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबरोबर काम केल्याबद्दल दिलजीत दोसांझवर टीका केली आहे. तसेच दिलजीतच्या जागी मी असतो, तर मी हे कधीही केलं नसतं, असंही ते म्हणाले.
त्याबद्दल एनडीटीव्हीशी बोलताना अनुपम खेर म्हणाले, “दिलजीतला त्याचं मत मांडण्याचा आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, वैयक्तिकदृष्ट्या बोलायचं झालं, तर मी असा निर्णय कधीच घेतला नसता.” ते पुढे उदाहरण देत म्हणाले, “समजा, कुणीतरी माझ्या वडिलांना मारलं; पण तो छान गाणं गातो किंवा छान तबला वाजवतो म्हणून मी त्याला घरी बोलावून गाण्याचा कार्यक्रम ठेवणार नाही.”
पुढे ते म्हणतात, “मी एवढा मोठा किंवा महान नाही. वडिलांना मारल्याबद्दल कदाचित मी त्या व्यक्तीला पुन्हा कानाखाली मारणार नाही. पण, माझ्या घरी बोलावणारही नाही. जे नियम मी माझ्या घरी पाळतो, तेच मी देशाबद्दलही पाळतो. कला ही महत्त्वाची असली तरी जर माझ्या कुटुंबावर काही आलं, तर मी गप्प बसणार नाही.”
त्यानंतर अनुपम खेर म्हणतात, “मी इतका महान नाही की, मी माझ्या कुटुंबाला मारहाण होताना किंवा कलेच्या नावाखाली माझ्या बहिणींचं सिंदूर पुसताना पाहू शकेन आणि शांत राहीन. जे हे करू शकतात; त्यांना ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.”
दिलजीत दोसांझच्या ‘सरदारजी ३’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालेला नाही. वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी तो भारतात न दाखविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलं की, हा चित्रपट पहलगाम हल्ल्यापूर्वी चित्रित केला गेला होता. तसेच भविष्यात पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम न करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.