Anupam Kher and Ajinkya Rahane: अनुपम खेर कायमच त्यांच्या भूमिकांमुळे, नवनवीन चित्रपटांमुळे तसेच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनुपम खेर हे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात.

नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ त्यांच्या विमान प्रवासादरम्यानचा आहे. त्यांच्याबरोबर अजिंक्य रहाणेदेखील दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्यांना एक असा अनुभव आला, ज्यामुळे त्यांना भीती वाटली होती असेदेखील त्यांनी सांगितले.

“एक खेळाडू म्हणून मला तुझे…”

अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. तसेच त्यांनी अंजिक्य रहाणेला टॅग करत लिहिले, “प्रिय अजिंक्य, तुझ्याबरोबर दिल्ली ते मुंबई विमान प्रवास करायला मजा आली. एक खेळाडू म्हणून मला तुझे कौतुक वाटते, पण तुझ्याकडे असलेली नम्रतादेखील मला आवडली.” पुढे त्यांनी लिहिले, “आपले विमान खाली उतरले आणि पुन्हा अचानक उडाण भरू लागले, तोपर्यंत मी चांगल्या भाषेत बोलत होतो, मला माफ कर.”

पुढे त्यांनी गमतीने लिहिले, “त्या परिस्थितीत मी सभ्य व्यक्तीसारखा वागलो नाही आणि माझ्या तोंडून काही शुद्ध हिंदी शब्द निघाले. पण, याची दुसरी बाजू अशी आहे की आपण एकापेक्षा जास्त कारणांसाठी एकमेकांना लक्षात ठेऊ. तुला खूप प्रेम आणि तुझ्यासाठी नेहमी प्रार्थना करत राहीन, जय हिंद.”

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अनुपम खेर अजिंक्य रहाणेला म्हणतात की तुझ्याबरोबर प्रवास करायला मजा येतेय. त्यावर अजिंक्य म्हणाला की, तुम्हाला भेटून आनंद झाला. अनुपम खेर त्याला म्हणतात की तू एक अद्भुत व्यक्ती आहेस. आज आपल्याला असा अनुभव आला की ज्यामुळे मी घाबरलो. विमान खाली उतरत असताना विमानाने पुन्हा उड्डाण केले. मला तुझे कौतुक वाटते, म्हणून मला कायमच तू आठवत राहशील. पण आता मी ही घटना कधीही विसरणार नाही. तू खूप धाडसी आहेस”, असे म्हणत अनुपम खेर यांनी अजिंक्यचे कौतुक केले.

दरम्यान, अनुपम खेर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते लवकरच प्रभासने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात दिसणार आहेत.