Anurag Kashyap Daughter Aaliyah Slams Audience For Ignoring Good Films : अनुराग कश्यप बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. सध्या तो त्याच्या ‘नीशांची’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग अनेकदा बॉलीवूडमधील चित्रपटांबद्दल त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. अशातच आता त्याच्या लेकीनेही सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडील अनुराग कश्यपच्या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती म्हणाली, “जेव्हा चांगले सिनेमे बनतात तेव्हा फार क्वचित लोक ते पाहण्यासाठी सिनेमागृहात जातात मात्र जेव्हा चांगले सिनेमे बनत नाहीत तेव्हा तेच लोक तक्रार करत असतात हे खूप निराशजनक आहे. अनेकदा असं झालं आहे आणि ‘धडक २’ त्याचंच एक उदाहारण आहे. नंतर अचानक काही वर्षांनी या सिनेमाचं ते कौतुक करतात”.

आलिया पुढे म्हणाली, “माझे वडील अनुराग कश्यप यांचा नवीन चित्रपट ‘नीशांची’ १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बनताना मी खूप जवळून पाहिलं आहे. जर आपल्याला सातत्याने चांगले सिनेमे पाहायचे असतील तर आपल्याला त्यांना तसा प्रतिसाद द्यावा लागेल. चांगले सिनेमे असेच वेळेबरोबर चांगले होतील असं काही नसतं”.

अनुराग कश्यप यांच्या लेकीने सोशल मीडियावर सतत चांगले सिनेमे बनत नाही अशी तक्रार करणारे पण जेव्हा सिनेमे प्रदर्शित होतात तेव्हा त्यांना प्रतिसाद न देणाऱ्यांना सुनावलं आहे. याबरोबर तिने तिच्या वडिलांचा आगामी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवहान केलं आहे.

अनुराग कश्यपच्या लेकीची पोस्ट

अनुरागच्या ‘नीशांची’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटातून बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, अनुराग कश्यपने आजवर ‘मनमर्जियान’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘महाराजा’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे तर यातील चित्रपटात कामही केलं आहे.