Anurag Kashyap on haters: अनुराग कश्यप हे त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘लस्ट स्टोरीज’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. चित्रपटांबरोबरच अनुराग कश्यप त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई सोडले असल्याचे म्हटले होते.

अनुराग कश्यप काय म्हणाला?

अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत लिहिले होते की, मी मुंबई सोडून केरळला शिफ्ट होत आहे. तसेच त्यांनी बॉलीवूडमध्ये जे चित्रपट बनत आहेत, त्यावरदेखील टीका केली होती. आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “मी वास्तव्याचे ठिकाण बदलले आहे. चित्रपट निर्मिती सोडलेली नाही, ज्यांना वाटते की मी निराश होऊन निघून गेलो आहे, त्यांना सांगावेसे वाटते की मी आहे आणि शाहरुख खानपेक्षा व्यग्र आहे. मी तितके व्यग्र असायला हवे, कारण मी जास्त पैसे कमवत नाही.

अनुराग कश्यपने पुढे लिहिले, “माझ्याकडे २०२८ पर्यंतच्या तारखा नाहीत. मी दिग्दर्शित करीत असलेले पाच चित्रपट यावर्षी प्रदर्शित होतील किंवा या वर्षी तीन आणि पुढच्या वर्षी दोन असे प्रदर्शित होतील. मी इतके काम करतो की दिवसाला मी तीन प्रोजेक्टला नकार देतो”, असे लिहित अनुराग कश्यप यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.

ही पोस्ट शेअर करण्याआधी अनुराग कश्यपने ‘डकैत’ या चित्रपटाची घोषणा केली. याआधी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काही दिवसांपूर्वी फुले चित्रपटांवरून वाद सुरू होता, त्यावेळीदेखील अनुराग कश्यपने पोस्ट शेअर करत मोदींवर टीका केली होती. मोदींनी जातव्यवस्था संपवली, त्यामुळे ‘संतोष’ चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही, अशी टीका अनुरागने केली होती. तसेच भलीमोठी पोस्ट शेअर करत कडक शब्दात त्याचे मत मांडले होते, त्यामुळे अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो.

शाहरुख खानबद्दल बोलायचे तर तो बॉलीवूडमधील एक यशस्वी अभिनेता आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या कामाप्रति समर्पणामुळे त्याचे सहकलाकार त्याचे कौतुक करतात. महत्त्वाचे म्हणजे, शाहरुखचे चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजतात, त्यामुळे त्याला चित्रपटांच्या मोठ्या प्रमाणात ऑफर येतात असे म्हटले जाते. तो व्यग्र अभिनेता असल्याचे सांगितले जाते. लवकरच अभिनेता ‘किंग’या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.