Anurag KashyapTalk About Vicky Kaushal Chhaava : बॉलीवूडच्या या वर्षातल्या काही गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे विकी कौशलचा छावा हा सिनेमा. अभिनय, संगीत, अॅक्शन अशा अनेक कारणांनी हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीस पडला. हिंदीसह मराठी प्रेक्षकांनीसुद्धा या सिनेमाला आपली पसंती दर्शवली.
अशातच आता ‘छावा’ सिनेमा तितकासा भावला नाही, असं मत बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केलं आहे. अनुराग कश्यपने नुकत्याच एका मुलाखतीत ‘छावा’बद्दल आपलं मत व्यक्त केलं. अनुराग कश्यप सध्या त्याच्या ‘निशांची’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. ‘द लल्लनटॉप’ या कार्यक्रमात त्याने ‘छावा’बद्दल आणि बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर आपले मत मांडले.
अनुराग म्हणाला, “मी ‘छावा’चा काही भाग पाहिला. विशेषतः शेवटचा अत्याचाराचा सीन, तोही केवळ माझा मित्र विनीत कुमार सिंह या चित्रपटात आहे म्हणून. त्याने यात सहाय्यक भूमिका साकारली होती. पण एकूणच मला हा चित्रपट भावला नाही.”
विकी कौशलच्या अभिनयाबद्दल विचारलं असता अनुराग म्हणाला, “आता आमच्यात फारसं बोलणं होत नाही. मी त्याला कशाबद्दल जज करत नाही. कारण प्रत्येकाची काही ना काही कारणं असतात… मला स्वतःला पुन्हा-पुन्हा तेच तेच बोलणं आवडत नाही. जे काही बोलायचं होतं, ते मी आधीच बोलून टाकलं आहे.”
यानंतर ‘छावा’ चित्रपटाबाबत अधिक स्पष्ट मत व्यक्त करताना अनुराग कश्यप म्हणाला, “चित्रपटात ज्या पद्धतीने त्रासदायक प्रसंगांमधून भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तो मला योग्य वाटला नाही. मी हा चित्रपट मुख्यतः माझा मित्र विनीत कुमार सिंहसाठी पाहिला होता. मला कोणावर टीका करायची नाही. दिग्दर्शकाने निवडलेली कथा मांडण्याची पद्धत मला समजली नाही, पण इतरांना ती आवडली असावी.”
अनुराग कश्यपने पुढे हेही स्पष्ट केलं की, ‘छावा’ हा चित्रपट त्याला भावनिकदृष्ट्या खूपच त्रासदायक वाटला. त्याने कबूल केलं की, हा चित्रपट तो पूर्ण पाहूच शकला नाही. याबद्दल तो म्हणाला, “मी आता हिंदी चित्रपट पाहणं जवळपास बंद केलं आहे. अलीकडे मी केवळ ‘धडक २’, ‘लापता लेडीज’ आणि ‘चमकीला’ हे काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत.”
दरम्यान, अनुराग कश्यपचा ‘निशांची’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत असून त्याचं हे बॉलीवूडमधील पदार्पण आहे.