भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत यंदाच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचा संघ आयसीसी ट्रॉफीच्या प्रतीक्षेत होता. अखेर हा १३ वर्षांचा दुष्काळ आता संपला असून यंदाचं, ‘टी-२० विश्वचषक’ स्पर्धेचं जेतेपद भारतीय संघाने पटकावलं आहे. या ऐतिहासिक विजयानंतर क्रीडासह राजकीय व मनोरंजन अशा विविध क्षेत्रामधील मान्यवर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

भारतीय फलंदाज विराट कोहलीला यंदाच्या टी-२० विश्वचषकात फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या खेळीवर क्रिकेटविश्वातील दिग्गजांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु, रोहितने त्याची पाठराखण करून आपलं मत व्यक्त केल्यानुसार विराटने टी-२० विश्वचषकाच्या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात ७६ धावा केल्या. याच ७६ धावांच्या जोरावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसमोर एकूण १७६ धावांचा डोंगर उभारता आला. परंतु, त्यानंतर बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने या सामन्यात वापसी करत जेतेपदावर आपलं नाव कोरलं. विराट अन् रोहितचा हा अखेरचा टी-२० विश्वचषक असल्याने दोघंही भावुक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. अशातच भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माने भारतीय संघाचं अभिनंदन करणारी पहिली पोस्ट शेअर केली आहे. या दोन्ही पोस्टच्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय संघातील खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहून अनुष्काच्या लाडक्या लेकीला देखील एका गोष्टीची काळजी वाटली. ही गोष्ट नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : “एका मॅचला इतके टर्निंग पॉईंट्स…”, भारताने टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव, मराठी कलाकार झाले भावुक

अनुष्का लिहिते, “आमच्या मुलीने आज सामना संपल्यावर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. यावेळी ‘या’ खेळाडूंना धीर देण्यासाठी तिथे कोणी असेल का’ असा प्रश्न तिने विचारला. मी तिला म्हणाले, हो डार्लिंग… कारण, आज जवळपास १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. आपल्या टीमने अभूतपूर्व विजय मिळवला आणि सगळ्यांनी या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स – अभिनंदन!” तर, अभिनेत्रीने दुसरी पोस्ट खास विराट कोहलीसाठी शेअर केली आहे.

हेही वाचा : Video: ‘मुरांबा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्याची स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’मध्ये जबरदस्त एन्ट्री! पाहा प्रोमो

अनुष्काने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये विराटचा ट्रॉफी उंचावतानाचा फोटो शेअर केला आहे. “माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली… तू माझा आहेस हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये” असं अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुष्का शर्माने शेअर केलेल्या या विजयानंतरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सध्या सर्व स्तरांवर भारतीय टीमचं कौतुक करण्यात येत आहे.