प्रसिद्ध गायक अरिजित सिंह हा त्याच्या आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याच्या गाण्याचे चाहते आहेत. महत्त्वाचे म्हणजे तो नेहमी आपल्या चाहत्यांना प्राधान्य देताना दिसतो. आता असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. अरिजित सिंहच्या युके कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अरिजितची चाहती त्याच्याकडे जात आहे. मात्र, त्याच्या बॉडीगार्डने तिला थांबवले. ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की अरिजित तिला आणि इतरांना हस्तांदोलनासाठी बोलवत होता. मात्र, बॉडीगार्डने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला बाजूला ढकलले.

अरिजित सिंहने मागितली चाहतीची माफी

स्टेजवर असलेल्या अरिजितला हा गोंधळ समजला. एक महिला चाहती त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्याच्या बॉडीगार्डने तिच्या मानेला पकडून तिला बाजूला ढकलल्याचा प्रकार लक्षात येताच अरिजित सिंहने म्हटले, “अशाप्रकारे कोणालातरी पकडणे अयोग्य आहे, मी तुम्हाला विनंती करतो कृपया बसून घ्या.” त्यानंतर त्याने ज्या महिलेबरोबर हा प्रकार घडला तिची माफी मागत म्हटले, “मला माफ करा मॅडम, तुमचे संरक्षण करण्यासाठी मी तिथे असायला पाहिजे होतो, मात्र मी तिथे नव्हतो. कृपया बसून घ्या.” त्याच्या या वागण्याचे जमलेल्या चाहत्यांनी ओरडून कौतुक केले.

हेही वाचा: आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर पाहून सासूबाई नीतू कपूर म्हणाल्या, “अंगावर शहारे…”

दरम्यान, याआधीदेखील अरिजित सिंहच्या लंडन कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अरिजित स्टेजवर चाहत्यांनी ठेवलेले खाद्यपदार्थ स्वत: उचलत असल्याचे दिसले होते. “मला माफ करा, हे माझे मंदिर आहे, तुम्ही इथे अशाप्रकारे अन्न ठेऊ शकत नाही”, अशी त्याने त्याच्या चाहत्यांना विनंती केली होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरिजित सिंहची अनेक गाणी जगभर प्रसिद्ध आहेत. ‘बंधेया रे बंधेया’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘तेरा यार हूँ मैं’, ‘लूट पूट गया’, ‘सोलमेट’, ‘गलती से मिस्टेक’, ‘सजनी’, ‘ओ माही’ अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत.