Arshad Warsi shares anecdote: ” बॉलीवूड अभिनेता काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात दिसला होता. हिरो हिंदूस्तानी’, मेरे दो अनमोल रतन’, मैंने प्यार क्यूँ कियाँ’, पागलपंती’, `टोटल धमाल’ अशा चित्रपटांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ‘जानी दुश्मन:एक अनोखी कहानी’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले. हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन राजकुमार कोहली यांनी केले होते.
जानी दुश्मनमध्ये अर्शद वारसीबरोबर अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अरमान कोहली, सनी देओल, सोनू निगम, मनीषा कोइराला, जॉनी लिवर, अमरीश पुरी असे अनेक लोकप्रिय कलाकार होते.
“ते पैशांबाबत कधीच कलाकारांना…”
अर्शद वारसीने नुकतीच राज शम्मानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याला विचारले की, त्याचे स्वत:चे काही असे चित्रपट आहेत का जे त्याला आवडत नाहीत? त्यावर अभिनेता म्हणाला, “माझे काही चित्रपट असे आहेत की ज्यामध्ये काम केले म्हणून मला अजिबात अभिमान वाटत नाही. या यादीत एक गाजलेला चित्रपट आहे, तो म्हणजे जानी दुश्मन. अरमान कोहलीचे वडील राजकुमार कोहली हे इंडस्ट्रीमधील काही चांगल्या लोकांपैकी एक आहेत. जेव्हा ते एखाद्या चित्रपटासाठी विचारतात, तेव्हा जवळजवळ सर्वच कलाकार त्यांना होकार देतात, त्याचे कारण म्हणजे ते खूप चांगले आहेत.”
अभिनेता पुढे म्हणाला, “मी त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो, त्यामुळे मला राजकुमार कोहलींबाबत इतके माहीत नव्हते, मला फक्त पैसे हवे होते. त्यावेळी मी आणि माझी पत्नी घर बांधत होतो. पण, ज्यावेळी आम्ही घर बांधण्यास सुरुवात केली, त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्हाला जिथून शक्य होईल तिथून आम्ही पैसे मिळवत होतो. जानी दुश्मनमधून जे पैसे मला मिळाले त्या पैशातून आम्ही आमच्या घराचे छत बांधले.”
राजकुमार कोहलींनी कधीही मानधन देण्यास उशीर केला नाही. याबाबत अर्शद वारसी म्हणाला, “मला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जाणीव झाली की, राजकुमार सर खूप चांगले आहेत. इंडस्ट्रीमधील इतरांपेक्षा ते वेगळे आहेत. ते पैशांबाबत कधीच कलाकारांना त्रास देत नाहीत. जर त्यांनी शूटिंगसाठी तुम्हाला बोलावले तर ते त्याच वेळेत शुटिंग सुरू करतात. तुमचे मानधन तुम्ही विचारण्याआधी तु्म्हाला मिळते, त्यामुळे जवळजवळ सर्व कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे.”
अर्शद वारसीने पुढे असेही सांगितले की, त्याने दिग्दर्शक राजकुमार कोहलींना सांगितले होते की माझ्या पात्राला आधी मारून टाका. मी राजकुमार कोहलींना म्हणालो, “मला आधी मारून टाका. पण, ते माझ्याशी सहमत नव्हते; तर अक्षय कुमारदेखील माझ्या पात्राला मारून टाकण्यास तयार नव्हता. तो विविध प्रयोग करत राहिला.”
दरम्यान, आगामी काळात अर्शद वारसी कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
