मनोरंजन विश्वात एखाद्या कलाकाराला अगदी एका रात्री प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. तर एखाद्याला अनेक वर्षं काम करूनही लोकप्रियतेचा किंवा प्रसिद्धीचा तो पल्ला गाठता येत नाही. मात्र, लोकप्रियता, प्रसिद्धी व पैसा या सगळ्यांचा विचार न करता, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं काम करत राहतो, तोच खरा कलाकार. अपयशाची तमा न बाळगता, आपल्या आवडीचं काम प्रामाणिकपणे करत राहणाऱ्या सच्च्या कलाकाराला कधी ना कधी यश हे मिळतंच.

असेच एक ज्येष्ठ अभिनेते होते, ज्यांच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांना फ्लॉप मास्टर हे नाव पडलं होतं. ते अभिनेते म्हणजे अरुणकुमार चॅटर्जी ऊर्फ उत्तमकुमार. बंगाली चित्रपटसृष्टीबद्दल बोललं जातं, तेव्हा अरुणकुमार चॅटर्जी ऊर्फ उत्तमकुमार यांचं योगदान विसरता येत नाही. ते बंगाली सिनेमाचे पहिले सुपरस्टार होते, ज्यांनी प्रादेशिक चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवर नेलं; पण त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला, पराभव पाहिला आणि यशाचं सर्वोच्च स्थान मिळवलं.

उत्तमकुमार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी कोलकाताच्या अहिरीटोला भागात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी केली. मात्र, अभिनय आणि रंगभूमीचं प्रेम त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यानंतर १९४८ साली त्यांनी ‘दृष्टिदान’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. पण दुर्दैवानं हा चित्रपट अपयशी ठरला. त्यानंतर त्यांचे सलग सात चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे लोकांनी त्यांना ‘फ्लॉप मास्टर’, असं म्हणायला सुरुवात केली होती.

सलग सात चित्रपटांच्या अपयशानंतरही उत्तमकुमार यांनी हार मानली नाही. त्यांनी १९५२ मध्ये ‘बसू परिवार’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. मग १९६६ मध्ये आलेला ‘नायक’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील टप्पा ठरला. या सिनेमात त्यांनी अरिंदम मुखर्जी या सुपरस्टारचा रोल केला होता. दिग्दर्शक सत्यजित रे यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “उत्तमकुमार हेच खरे सुपरस्टार आहेत.” तयानंतरच त्यांना ‘महानायक’ हे विशेष बिरुद मिळालं.

उत्तमकुमार आणि सुचित्रा सेन या जोडीचे ३० पैकी तब्बल २९ चित्रपट ठरले हिट

उत्तमकुमार आणि सुचित्रा सेन यांची जोडी बंगाली सिनेमात खूपच लोकप्रिय ठरली. त्यांनी जवळपास ३० चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यापैकी तब्बल २९ चित्रपट हिट ठरले. ‘शारे चोत्तोर’, ‘सप्तपदी’, ‘हरानो सूर’, ‘अमर प्रेम’ यांसारखे चित्रपट आजही लोकांच्या मनात आहेत. एक मुलाखतीत उत्तमकुमार यांनी कबूल केलं होतं, “सुचित्रा सेन नसती, तर मी कधीच ‘उत्तमकुमार’ झालो नसतो.”

 अरुणकुमार चॅटर्जी ऊर्फ उत्तमकुमार
अरुणकुमार चॅटर्जी ऊर्फ उत्तमकुमार

बंगाली चित्रपटसृष्टीत नाव मिळवल्यानंतर उत्तमकुमार यांनी हिंदी चित्रपटांतही पाऊल टाकलं. १९७५ साली आलेल्या ‘अमानुष’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. शक्ती सामंता दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी आणि बंगाली अशा दोन्ही भाषांमध्ये आला होता. त्यानंतर त्यांनी ‘आनंद आश्रम’, ‘छोटी सी मुलाकात’, ‘दूरियाँ’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ जुलै १९८० रोजी ‘ओगो बधू सुंदरी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागलं. यावेळी त्यांनी स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं. मात्र, उपचार सुरू असतानाच २४ जुलै १९८० रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. २५ जुलै २०२५ रोजी त्यांच्या निधनाला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या पश्चात आज इतका काळ लोटला असतानाही बंगाली सिनेमाचा उल्लेख केला जातो, तेव्हा ‘महानायक’ उत्तमकुमार यांचं नाव आदरानं घेतलं जातं.