दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सलमान खानबरोबर १९९२ साली ‘जागृती’ नावाचा चित्रपट केला होता. या चित्रपटात अशोक सराफ खलनायक होते. त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगचा एक प्रसंग सांगितला आहे. एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान अशोक सराफ यांना भयंकर अनुभव आला होता.
‘जागृती’मधील एका दृश्याचे शूटिंग करताना सलमानने खरा चाकू अशोक यांच्या गळ्याला लावला होता. त्यावेळी गळा चिरला गेला होता, असं अशोक सराफ यांनी नमूद केलं. रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “त्याने खरा चाकू माझ्या गळ्याजवळ धरला होता. चाकूचे टोक गळ्याला लागले. आम्ही दोघेही डायलॉग म्हणू लागलो आणि मी त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. सलमान चाकू जोरात दाबत होता. मी त्याला म्हणालो, ‘चाकूने हळू दाब, गळा चिरतोय’.”
सलमानला हे आठवतंय की नाही…
पुढे अशोक सराफ म्हणाले, “सलमानने मला विचारलं की त्याने काय करावं? मग मी त्याला म्हटलं चाकू उलटा धर. तो म्हणाला कॅमेरा आपल्यासमोर आहे, त्यामुळे त्यात चाकू उलटा आहे हे दिसेल. मग मी त्याला म्हटलं राहुदेत. आम्ही तो सीन पूर्ण केला आणि मग मी पाहिलं की माझा गळा चिरला गेला होता आणि रक्त येत होतं. जर माझ्या गळ्याची नस कापली गेली असती तर मी तिथेच… मी तो प्रसंग कधीच विसरणार नाही. सलमानला हे आठवतंय की नाही माहीत नाही, कारण असं लोकांना लक्षात राहत नाहीत, विसरून जातात.”

‘जागृती’मध्ये सलमान खान आणि अशोक सराफ यांच्यासह करिश्मा कपूर, शिवा रिंदानी, पंकज धीर आणि प्रेम चोप्रा देखील होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. सलमान व अशोक सराफ यांनी ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बंधन’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा एआर मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ या अॅक्शन ड्रामामध्ये दिसला होता. तो लवकरच त्याच्या २०१२ साली आलेल्या ‘किक’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. तसेच सलमानजवळ २०२० च्या गलवान व्हॅली संघर्षावर आधारित एक चित्रपट देखील आहे. याचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करणार आहे.