Ashok Saraf on Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या कामाप्रतिच्या समर्पणासाठी ओळखला जातो. त्याच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार त्याच्या आठवणी सांगतात. याबरोबरच, अभिनेत्याच्या स्वभावाचेदेखील अनेकजण कौतुक करताना दिसतात.
“त्यासाठी तो कायम प्रयत्न करत असतो”
आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांनी काही हिंदी सिनेमातही काम केले आहे. ‘येस बॉस’ आणि ‘करण अर्जुन’ या चित्रपटात अशोक सराफ आणि शाहरुख खान यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
रेडिओ नशाला दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानबद्दल अशोक सराफ म्हणाले, “इंडस्ट्रीमध्ये त्याच्याइतका मेहनती कोणीही नाही. तो त्याच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो. एखादी भूमिका उत्तम कशी साकारता येईल, यासाठी तो कायम प्रयत्न करत असतो. तो मेहनत न करता इतका मोठा अभिनेता झाला नाही. एखादी भूमिका साकारताना तो छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो. आणि त्यामध्ये काही कमी राहू नये, यासाठी प्रयत्न करतो.”
अशोक सराफ म्हणालेले की मी शाहरुखला एक सीन करण्यासाठी सल्ला दिला होता. विशेष बाब म्हणजे शाहरुख ते काळजीपूर्वक ऐकत होता आणि ते अवलंबण्याचा प्रयत्न करत होता. काही कलाकारांना इतरांनी सल्ले दिलेले अजिबात आवडत नाहीत. ते पुन्हा एखादा सीन करण्यासाठी नकार देतात. पण शाहरुख एखादा सीन व्यवस्थित व्हावा, त्यासाठी तो सराव करतो. तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा योग्य परिणाम होतोय की नाही, हेदेखील तो पाहतो. तो फक्त चांगला अभिनेता नाही, तो उत्तम माणूसही आहे.”
“मला जर कोणी विचारले की सगळ्यात जास्त ऊर्जा कोणत्या कलाकारामध्ये आहे? तर मी शाहरुखकडे बोट दाखवेन. त्याच्याकडे इतकी ऊर्जा आहे की ज्यामुळे तो कधीच थांबत नाही. तो कधीच थकत नाही. जे आजच्या काळात फार दुर्मिळ आहे. इतरांनी त्याच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्या चांगल्या सवयींमुळेच तो आज जिथे आहे त्या स्थानावर पोहचू शकला आहे”, असे म्हणत अशोक सराफ यांनी शाहरुख खानचे कौतुक केले होते.
शाहरुख खानचे कौतुक करणारे अशोक सराफ हे पहिले अभिनेते नाहीत. शाहरुख खानबरोबर काम केलेल्या अनेक अभिनेते, अभिनेत्री यांनी शाहरुखच्या काम करण्याच्या पद्धतीचे काम केले आहे. दरम्यान, शाहरुख लवकरच द किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सुहाना खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.