Ashwini Kalsekar On Color Discrimination : मनोरंजन क्षेत्रात काम करताना अनेक कलाकारांना विविध प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेकदा कलाकारांना त्यांच्या दिसण्यावरुन, उंचीवरून आणि रंगामुळे टीका तसंच अपमान श्न् करावे लागतात. काही कलाकार हे अपमान सहन करत निमूटपणे काम करतात. पण काही कलाकार मात्र वेळीच अशा अपमानांना थेट उत्तर देतात. असंच एका मराठी अभिनेत्रीला वर्णभेदामुळे अपमान सहन करावा लागला होता आणि या अभिनेत्री म्हणजे अश्विनी काळसेकर. एका अ‍ॅड फिल्मनिमित्त त्यांना हा अनुभव सहन करावा लागला होता.

अश्विनी काळसेकर यांनी स्मिता तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात वर्णभेदामुळे अपमान सहन करावा लागल्याची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मी एकच अ‍ॅड फिल्म केली. बऱ्याच वर्षांपुर्वी, कदाचित ‘सीआयडी’च्या वेळची ही गोष्ट आहे. मेकअप रूममध्ये गेले. तेव्हा जी कुठची एजन्सी होती, त्यातली एक मुलगी आली आणि ती मेकअप दादांना ‘तिला (मला) गोरी करा’ असं सांगत होती. त्यानंतर तिने पुन्हा ‘तिला गोरी करा’ असं सांगितलं. तिने असं अनेकदा त्यांना सांगितलं. शेवटी माझ्या डोळ्यांत पाणी आलं.”

यापुढे अश्विनी म्हणाल्या की, “म्हणजे मी घाबरत नाही. पण त्या मेकअप दादांसाठी मला वाईट वाटत होतं की, ते बिचारे प्रयत्न करत आहेत आणि मी गोरी होत नाहीय. मला वाईट वाटलं, त्यामुळे डोळ्यांत पाणी आलं. मला कळत नव्हतं की, ही मुलगी नक्की आहे तरी कोण? म्हणजे मालकीण आहे की कोण आहे? मग शेवटी दादा तिला म्हणाले की, असं आहे तर यांना तुम्ही निवडलं का? तुम्हाला यांच्या त्वचेचा रंग माहीत नव्हता का? त्यावर त्या मुलीने काही तर कपड्यांवरुन उत्तर दिलं. मग मी मध्ये बोलले की, मी जाते. मी घाबरत नाही.”

अभिनेत्री अश्विनी काळसेकर (फोटो सौजन्य : इंडियन एक्प्रेस)
अभिनेत्री अश्विनी काळसेकर (फोटो सौजन्य : इंडियन एक्प्रेस)

यानंतर त्यांनी सांगितलं की, “मला कामाची गरज आहे, मला अ‍ॅड फिल्म करायची आहे. पण तुला जर त्रास होत आहे आणि तुझं अ‍ॅड फिल्मचं जे स्वप्न आहे, ज्यात जर मी फिट होत नाही, तर मग मी जाते. मला काहीच हरकत नाही. पण रंगाबद्दल हे सारखं सारखं ऐकून मला राग येईल. आतापर्यंत मला वाईट वाटत आहे, पण नंतर माझा ताबा सुटेल आणि मग माझं तोंड कुणी बंद करु शकणार नाही. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, मी एकही अ‍ॅड फिल्मच्या ऑडिशनसाठी जात नाही. तुम्ही गोऱ्यांनाच घ्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अश्विनी यांनी असं म्हटलं की, “ड्रेस डिझायनर आणि मेकअपमधील जितके पण मोठे लोक आहेत, इतकंच नाही तर मी हॉलीवूडचा एक चित्रपट केला त्या लोकांना माझी त्वचा आणि त्वचेचा रंग आवडला. पण आपल्या देशातच फक्त गोरं हवं असतं. गोरं आणि घारं” दरम्यान, अश्विनी काळसेकर यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘जोधा अकबर’, ‘कसम से’, ‘गोलमाल अगेन’, ‘सिंघम रिटर्न्स’ अशा अनेक चित्रपटांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.