दाक्षिणात्य सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन असलेले अनेक हिट सिनेमे देऊन स्वतःची चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे अ‍ॅटली. सुपरस्टार विजय थालापतीबरोबर अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर अ‍ॅटलीने शाहरुख खानबरोबर ‘जवान’ सिनेमा केला आणि बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले. आता अ‍ॅटली साऊथ आणि बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सना एकत्र घेऊन सिनेमा तयार करणार असल्याची चर्चा आहे. सलमान खान आणि कमल हसन हे अ‍ॅटलीच्या पुढील अ‍ॅक्शनपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ही चर्चा सुरू असून, दिग्दर्शक अ‍ॅटली आपल्या पुढील चित्रपटासाठी सलमान खान आणि कमल हसन यांच्याशी चर्चा करत होता. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅटली सलमान खान आणि कमल हसन यांना एका थरारक अॅक्शन चित्रपटासाठी एकत्र आणणार आहे, हे अधिकृतपणे निश्चित झाले आहे. या आगामी सिनेमात हा ‘जवान’ दिग्दर्शक काय नवीन घेऊन येणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणार आहे.

हेही वाचा…AP Dhillon : पंजाबी गायकाच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; सलमान खानचा उल्लेख असलेल्या पोस्टमुळे खळबळ!

या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात जानेवारी २०२५ मध्ये होणार असली, तरी या चित्रपटाची पूर्वतयारी यावर्षी ऑक्टोबरपासून सुरू होईल. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अ‍ॅटली मागील काही महिन्यांपासून या दोन महानायकांबरोबर चर्चा करत आहे. सलमान खान आणि कमल हसन, दोघेही या सिनेमाबद्दल उत्साहित आहेत. या महिन्याच्या शेवटी कथा ऐकल्यानंतर अंतिम कागदपत्रे तयार करण्यात येणार आहेत.

सूत्रांनी पुढे सांगितले की ‘जवान’ च्या यशानंतर, अ‍ॅटली भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या अॅक्शन चित्रपटांपैकी एक असा सिनेमा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. हे अ‍ॅटलीसाठी एक स्वप्नवत कास्ट आहे. एक कुशल तांत्रिक टीम या आगामी चित्रपटाचा भाग असेल. चित्रपटाचे नाव आणि इतर अधिक तपशीलांची अद्याप घोषणा झालेली नाही.

हेही वाचा…अमली पदार्थांचे सेवन, करिअरला लागलेली उतरती कळा; गायकाने सांगितला वाईट काळाचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खान सध्या ए.आर. मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट ‘ईद २०२५’ मध्ये प्रदर्शित होणार असून, यात रश्मिका मंदाना आणि प्रतीक बब्बर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर कमल हसन त्यांच्या आगामी ‘थग लाईफ’ आणि ‘इंडियन ३’ चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहेत.