दैनंदीन जीवनात सध्या डिजीटलचा वापर वाढल्याचे दिसत आहे. रेल्वे, विमानाची तिकीटे घरबसल्या काढल्यापासून ते बँकेची काही कामेदेखील सध्या घरातून करता येतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात माणसाचे आयुष्य सोपे झाले आहे.

जितका गोष्टी डिजीटल होण्याचा फायदा आहे, तितकाच त्याचा धोकाही असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. अनेकदा मोठ्या प्रमाणात फसवणूकही केली जाते. फोन करून अमुक एखाद्या बँकेमधून बोलत असल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अनेकदा जनजागृतीसाठी बँका, शासन यांच्याकडून वेळोवेळी सतर्कतेचा इशारा दिला जातो. आता ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

विशेष बाब म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. पुण्यातील एका तरुणावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

या प्रकरणात अमानत शेख (वय ३१, रा.-पुणे) या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानत शेखने आमिर खानचा नंबर मिळवला. आमिर खानला फोन करून मी खासदार उदयनराजे भोसले बोलतोय असं सांगितलं. तसेच, मॅरेथॉन आयोजित केली असून त्यासाठी आर्थिक मदत करा असेही सांगितले. तसेच आमिर खानच्या पर्सनल असिस्टंटलादेखील सतत फोन व मेसेज करून संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खानला याबाबत संशय आल्यानंतर आमिर खानने उदयनराजे भोसले यांना पत्र पाठवून याबाबत चौकशी केली. त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी चॅरिटीसाठी तुमच्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर पंकज चव्हाण यांनी आमिर खानला ज्या नंबरवरून उदयनराजे भोसले या नावाने फोन केला जात होता. त्याच्याशी संपर्क साधला असता त्या व्यक्तीने तो उदयनराजे भोसले बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या नंबरला फोन केल्यानंतर ट्रू कॉलरवर उदयनराजे भोसले असे नाव दिसत आहे. मात्र, पोलिस तपासात या व्यक्तीचे नाव अमानत शेख असल्याचे समोर आले आहे.