प्रभासच्या आदिपुरुषशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक चित्रपटगृहात तोडफोड करताना दिसत आहेत. आही या लोकांना ‘आदिपुरुष’ आवडला नसल्याने त्यांनी ही तोडफोड केल्याचं सांगितलं होतं, पण प्रकरण वेगळं आहे. चित्रपटगृहात तोडफोड करणारी ही मंडळी प्रभासचे फॅन्स आहेत अन् ‘आदिपुरुष’चा शो उशिरा सुरू झाल्याने त्यांनी हा धिंगाणा घातल्याचं स्पष्ट झालं आहे.

दक्षिणेत सुपरस्टार्स आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळंच नातं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या लाडक्या सुपरस्टारसाठी तिथली लोकं अशक्य गोष्टीही करतात. तेलंगणातील संगारेड्डी येथे असलेल्या ज्योती सिनेमा नावाच्या चित्रपटगृहामध्ये ‘आदिपुरुष’चा शो होता. काही तांत्रिक कारणामुळे चित्रपट वेळेवर सुरू होऊ शकला नाही. अन् ४० मिनिटे उशीर झाला.

आणखी वाचा : “हनुमान बहिरे होते…” ‘आदिपुरुष’ दिग्दर्शक ओम राऊतचे ‘ते’ जुने ट्वीट चर्चेत

यामुळेच तिथल्या कथित प्रभासच्या चाहत्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोक तिथल्या खिडक्यांच्या काचा फोडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेरा काढून ते तोडताना दिसत आहेत. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर हिंसाचाराच्या आणखी काही घटना समोर आल्या आहेत. ‘इंडिया टुडे’च्या आणखी एका रिपोर्टनुसार एका चित्रपटगृहात एका व्यक्तीने हनुमानासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसायचा प्रयत्न केला. यावर आजूबाजूच्या लोकांनी आक्षेप घेतला अन् त्यांच्यातही झटापट झाल्याची बातमी समोर आली होती. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४० कोटींची कमाई केली आहे.