Bads Of Bollywood Fame Actor Talks About Struggle : ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही सध्या ओटीटीवरील बहुचर्चित वेब सीरिज आहे. बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या मुलानं या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक कलाकार झळकले आहेत. अशातच या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेल्या अभिनेत्याने त्याच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे.

आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये अभिनेता बॉबी देओल, लक्ष्य लालवाणी, राघव जुयाल यांसारखे अनेक कलाकार झळकले आहेत. अशातच आता त्यातील अभिनेता राघव जुयालने इंडस्ट्रीत नवीन असतानाच्या त्याच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. राघव अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याची डान्सर म्हणून ओळख होती. तो एक उत्कृष्ट नर्तक आहे आणि त्याच्या डान्सचे अनेक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यानं नृत्याबरोबर अभिनेता म्हणूनही काम करायला सुरुवात केली आणि आता ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली, ज्यासाठी त्याचं कौतुकही होत आहे.

“एका खोलीत दहा मुलांबरोबर राहिलो” – राघव

राघव पहिल्यांदा चर्चेचा विषय ठरलेला ते त्याच्या एक व्हायरल डान्स व्हिडीओमुळे. त्यानंतर त्याला ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो देशभरात त्याच्या डान्सच्या स्टाईलमुळे ओळखू लागला. ‘युवा’शी संवाद साधताना राघवने इंडस्ट्रीत नवीन असतानाच्या त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलची माहिती दिली आहे. राघव म्हणाला, “जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. पण, मी ते दिवससुद्धा खूप एन्जॉय केले. मी अनेकदा वडापावसुद्धा खूप आवडीने खायचो…”.

राघव पुढे याबद्दल म्हणाला, “जेव्हा मी डान्सर होतो तेव्हा मी एका खोलीत १० मुलांबरोबर राहायचो. आमच्या घरातील फ्रिज चालायचं नाही. आम्ही सगळी मुलं त्यात आमचे कपडे ठेवायचो आणि त्या फ्रिजचा वापर कपडे ठेवण्यासाठीच करायचो. त्यामुळे आमच्या घरी कोणी आलं आणि त्यांनी जर ते फ्रीज उघडलं, तर त्यांना आश्चर्य वाटायचं की इथे कपडे का ठेवले आहेत वगैरे.”

राघवने ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानच्या घराला भेट दिल्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, “मी जेव्हा पहिल्यांदा ‘मन्नत’मध्ये गेलो तेव्हा तिथे विमानतळावर असतात तसे स्कॅनर होते. मला त्यामधून जावं लागलं कारण- तेथील लोक मला ओळखत नव्हते.” त्यानं पुढे सांगितलं की, त्यावेळी त्यानं तेथील मदतनीसांना आर्यनची खोली कुठे आहे, असं विचारलं आणि नंतर त्याच्याच लक्षात आलं की, हा शाहरुख खानचा आलिशान बंगला आहे. इथे खोली नाही, तर मोठे मजले असतात.