काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. यानंतर दहशतवाद्यांविरुद्ध देशभरतून तीव्र निषेध करण्यात आला. अनेक कलाकारांनीही सोशल मीडियामार्फत पोस्ट करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या; तर हल्ला झाल्यानंतर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन करण्यात आले, यासह काही दिवसांनंतर आता पाकिस्तानी कलाकारांचेही सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन केले आहेत.

सध्या मुंबईमध्ये ‘जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेन्मेंट सुमित २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान, सेलिब्रिटी, राजकीय नेते यांसह अनेक प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. याच कार्यक्रमाला जॅकी श्रॉफदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

पुढे त्यांना पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन झाल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर त्यांनी, “मला सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल काही बोलून कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही. पण,आताची परिस्थिती बघता त्यांचा निर्णय योग्य आहे. थोडं अंतर ठेवलेलं आपल्या भल्याचं आहे आणि जोवर पंतप्रधान काही बोलत नाही तोपर्यंत आपण सगळे काय बोलणार,” असं त्यांंनी म्हटलं आहे.

दरम्यान, जॅकी श्रॉफ हे त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात, तर आजही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत असून अभिनयासह त्यांना फिटनेसचीही आवड असलेली पाहायला मिळते. यासह अनेकदा ते त्यांच्या सिक्रेट रेसिपी सांगताना दिसतात, ज्याचे रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच आता लवकरच जॅकी श्रॉफ ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ३० एप्रिल रोजी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला, तर ‘हाऊसफुल ५’ या आगामी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, मिथुन चक्रवर्ती यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.