Bobby Deol Talks About Karishma Kapoor : बॉबी देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच अभिनेत्याला इंडस्ट्रीत ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. अभिनेत्याने १९९५ मध्ये आलेल्या ‘बरसात’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं, ज्यामध्ये त्याच्यासह करिश्मा कपूर झळकणार होती; परंतु तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिलेला. याबद्दल आता अभिनेत्याने सांगितलं आहे.

बॉबी देओलने ‘स्क्रिन’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. ‘बरसात’मध्ये त्याच्याबरोबर ट्विंकल खन्ना झळकलेली. परंतु, ट्विंकल नाही तर करिश्मा कपूरला या चित्रपटासाठी पहिली पसंती होती. मात्र, करिश्माने या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिलेला. याबद्दल बॉबी देओल म्हणाला, “खरंतर या चित्रपटासाठी करिश्मा कपूरला पहिली पसंती होती. पण, त्यावेळी चित्रपटाची कथा पूर्णपणे तयार झाली नव्हती आणि त्यावेळी स्त्रिया दीर्घकाळ चित्रपटांत काम करू शकत नाही अशी परिस्थिती होती, जी सुदैवानं आता बदलली आहे.”

करिश्माबद्दल बॉबी देओल पुढे म्हणाला, “यामुळे या चित्रपटात काम करण्याबद्दल करिश्माच्या मनात शंका होती आणि त्यासाठी मी तिला अजिबात दोष देत नाही. तिने ‘प्रेम कैदी’ या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली.” ट्विंकलबद्दल अभिनेता म्हणाला, “मला असं वाटतं, ट्विंकल व मी एकाच चित्रपटातून पदार्पण करणं हे आमच्या नशिबात लिहिलेलं होतं. इंडस्ट्रीत काम न करणं हा पूर्णपणे तिचा निर्णय होता. तिला इथे काम करायला अजिबात आवडायचं नाही.”

ट्विंकलबद्दल बॉबी देओल पुढे म्हणाला, “ती खूप निर्भीड आहे. तिचा एक ऑरा होता, जो आजही पाहायला मिळतो. ती स्वतःच्या बुद्धीचा वापर करायची, त्यामुळेच आज ती लेखिक झाली आहे.” पुढे बॉबी देओलला चित्रपटादरम्यानच्या आठवणींबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या खूप आठवणी आहेत. मुहूर्ताचा शॉट माझ्या वाढदिवसाच्या दिवशी २७ जानेवारीला झालेला, त्यावेळी मी २२-२३ वर्षांचा होतो.”

दरम्यान, ‘बरसात’नंतर बॉबी देओलने ‘गुप्त’, ‘करीब’, ‘बादल’, ‘हम तो मोहोब्बत केरेंगे’, ‘अजनबी’, ‘हमराझ’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केलं. अलीकडे तो चर्चेत आला ते ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे, तर सध्या तो आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील भूमिकेमुळे चर्चेत आहे.