रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चित्रपटाने चार दिवसांत ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

चित्रपटावर टीका होत असली तरी यातील रणबीर आणि बॉबी देओल दोघांच्या अभिनयाची प्रशंसा होताना दिसत आहे. रणबीरचा अभिनय लोकांना आवडला असला तरी बॉबी देओलच्या छोट्याशा भूमिकेने प्रेक्षकांना चकित केलं आहे. खरं पाहायला गेलं तर रणबीरपेक्षा बॉबीच भाव खाऊन गेला आहे. चित्रपटात बॉबीने एका क्रूर खलनायकाची भूमिका निभावली आहे.

आणखी वाचा : ‘ZNMD’च्या सीक्वलबद्दल कतरिना कैफचं मोठं विधान म्हणाली, “आम्ही सगळेच झोयाला…”

आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान हा चित्रपट पाहून आपल्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा बॉबीने केला आहे. ‘पिंकव्हीला’शी संवाद साधताना बॉबी म्हणाला की हा चित्रपट पाहताना त्याची आई फारच अस्वस्थ झाली होती. बॉबी म्हणाला, “माझ्या मृत्युचा सीन पाहून माझी आई फार अस्वस्थ झाली. ती म्हणाली असे चित्रपट करत जाऊ नकोस, मला पहावलं जात नाही. तिच्या या म्हणण्यायावर मी तिला म्हणालो की हे बघ मी तुझ्या समोर उभा आहे, मी फक्त ती भूमिका निभावली आहे. पण एकूणच या चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून तिला फार आनंद झाला आहे. तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना मला भेटायचं आहे. असंच काहीसं ‘आश्रम’ प्रदर्शित झाली तेव्हा अनुभवायला मिळालं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच आपली पत्नी आणि मुलांना नेमका हा चित्रपट कसा वाटला याबद्दल बॉबी म्हणाला, “माझे वडील आणि भाऊ सोडले तर घरच्यांनी सगळ्यांनी हा चित्रपट पाहिला आहे अन् त्यांची प्रतिक्रिया ही प्रेक्षकांसारखीच आहे. माझी पत्नी आणि माझ्या मुलांच्या डोळ्यात तर मला केवळ आनंदच दिसतोय. एक वडील म्हणून मी नेमका त्यांच्या आयुष्यात कुठे आहे याची मला आज जाणीव होत आहे. त्यांना वाटतंय की हे यश मिळणं फार आवश्यक होतं कारण त्यांनी माझा पडता काळही जवळून पाहिला आहे.”