This Bollywood Actor Was The First Choise For Jab We Met : ‘जब वी मेट’ हा बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. यातील करीना कपूर व शाहिद कपूर यांच्या केमिस्ट्रीने अनेकांची मनं जिंकलेली. या चित्रपटातील गाणीसुद्धा त्याकाळी खूप गाजलेली. आजही शाहिद व करीनाचे चाहते हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहताना दिसतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? शाहिद कपूर या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता.
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’मध्ये करीनाने गीत तर शाहिदने आदित्य ही भूमिका साकारलेली. यातील आदित्यच्या भूमिकेसाठी शाहीदपूर्वी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलाची निवड करण्यात आलेली. नुकतंच अभिनेत्याने याबद्दल मुलाखतीत सांगितलं आहे. तो अभिनेता म्हणजे बॉबी देओल. सध्या आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मुळे चर्चेत असलेल्या बॉबी देओलने नुकतीच राज शमानीला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने ‘जब वी मेट’बद्दल सांगितलं आहे.
‘जब वी मेट’बद्दल बॉबी देओलची प्रतिक्रिया
अभिनेता म्हणाला, “मी खूप दुखावलो गेलो होतो. मला काम मिळत नव्हतं. मी मोजक्याच दिग्दर्शकांबरोबर काम करत होतो. माझा इम्तियाजबरोबर कुठला वादही झाला नव्हता. मला तो माणूस आवडतो. तो इंडस्ट्रीतील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे. मला असं वाटतं, त्यावेळी त्याच्या करिअरमध्ये तोसुद्धा निर्णय घेण्याबद्दल निवड करताना गोंधळेला असावा. पण, ते चुकीच्या पद्धतीने घडलं. त्याचा ‘सोचा ना था’ पाहिल्यानंतर मी इम्तियाजला सांगितलेलं की, मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे.”
‘जब वी मेट’साठी करीना कपूरने आधी दिलेला नकार
बॉबी देओल पुढे म्हणाला, “मी काही निर्मात्यांना भेटून इम्तियाजबद्दल सांगितलेलं, पण त्यांनी त्याला नकार दिला. मी त्याला करीना कपूरकडे पाठवलं, पण तिने स्क्रिप्ट वाचून नम्रपणे नकार कळवला. एक वर्षांनंतर मी प्रिती झिंटाला विचारलं, पण तिला त्यावेळी काही कारणांमुळे तो चित्रपट करणं शक्य नव्हतं.”
बॉबी देओल याबद्दल पुढे म्हणाला, “त्यानंतर ज्या निर्मात्यांनी इम्तियाजला आधी नकार दिलेला, त्यांनीच इम्तियाजला बोलावून करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची या चित्रपटासाठी निवड केली. त्या चित्रपटाचं आधी ‘गीत’ हे नाव होतं, कारण त्या मुलीची ती कथा आहे; पण नंतर ते बदलण्यात आलं आणि माझ्या जागी शाहिदने त्यात काम केलं. माझ्या नशिबात तो चित्रपट नव्हता. पण त्याचा मला खूप त्रास झलेला, कारण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कुठला चित्रपटही नव्हता.”