फिल्मफेअर पुरस्कार बॉलीवूड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठित मानला जातो. फिल्मफेअर सोहळ्याचं यंदाचं हे ६९ वं वर्ष आहे. दरवर्षी मुंबईत या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. परंतु, यंदा हा सोहळा गुजरात टुरिजमच्या साहाय्याने गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत पार पडणारा सोहळा यंदा गुजरातमध्ये आयोजित केल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक्स (ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे.

“भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ १०० वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली. निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती. फिल्मफेअर अवॉर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरतेच केला. एकेकाची घरे शंभर – दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले; पण, या मातीतूनच कमावले, हे देखील महत्वाचे आहे.” अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये केली आहे.

हेही वाचा : ट्विंकल खन्नाने ५० व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; अक्षय कुमार पत्नीचं कौतुक करत म्हणाला, “मी शिकलो असतो तर…”

jitendra awhad
जितेंद्र आव्हाडांची एक्स पोस्ट

“थोडी तरी या शहराबद्दल प्रेम – आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही. १०५ हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचं काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या? माफ करा आम्हाला!” असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : जावेद अख्तर : शब्दांचे इमले रचणारा ‘जादू’गार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देखील एक्स पोस्ट शेअर करत यासंदर्भात टीका केली होती. दरम्यान, यंदाचा ६९ वा ह्युंडाई फिल्मफेअर सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हा सोहळा मुंबईतच आयोजित केला जातो. केवळ २०२० मध्ये फिल्मफेअरचं आयोजन गुवाहाटीमध्ये करण्यात आलं होतं. आधीच मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असताना फिल्मफेअर पुरस्कार सोहळाही गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.