तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर पुन्हा मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना येणारं नैराश्य, डिप्रेशन या गोष्टी चर्चेत आल्या आहेत. याबरोबरच सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबतही बरेच नवीन खुलासे होत असल्याने या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. मध्यंतरी त्याचा सहकलाकार अमित साध यानेदेखील सुशांतबद्दल वक्तव्य केलं होतं. अमित आणि सुशांत दोघांनी आपलं करिअर टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुरू केलं.

त्यानंतर दोघे ‘काय पो चे’ या चित्रपटात एकत्र दिसले. नुकतंच अमितने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आयुष्यातील खडतर काळाबद्दल खुलासा केला आहे. अमितच्या आयुष्यातसुद्धा असा एक काळ होता जेव्हा त्याला आत्महत्येचे विचार यायचे. याविषयीची अमितने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा : नील नितीन मुकेशचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; पोस्ट शेअर करत अभिनेत्याने केलं नव्या वर्षाचं स्वागत

‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना अमित म्हणाला, “मी ज्या खडतर समस्यांचा सामना करत होतो त्या काळात माझ्याबरोबर माझी माणसं होती, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. बऱ्याच लोकांनी त्या काळात माझ्याशी संवाद साधला, मला मदत केली. जे कलाकार मनोरंजनक्षेत्रात काम करतात ते सर्वात जास्त वेळ त्यांच्या सहकलाकारांबरोबर घालवतात, त्यामुळे सहकलाकारांनी तितकं समंजस असणं गरजेचं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “सहकलाकारांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे, एकमेकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जर तीच लोक समोरच्या व्यक्तीच्या चुका काढायला लागली किंवा त्याला कमी लेखायला लागली की त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, नैराश्य येतं. जेव्हा माणसाच्या आयुष्यात नैराश्य येतं तेव्हा तो चुकीच्या गोष्टींचाच जास्त विचार करायला लागतो हे मी स्वानुभवावरून सांगत आहे.” अमित साध नुकताच ‘ब्रीद : इनटू द शॅडो’ या वेबसीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह झळकला.