पैशासाठी बऱ्याचदा लोकांना इच्छा नसतानाही काही कामे करावी लागतात. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. असे काही कलाकार आहेत; जे पैशासाठी अंत्यसंस्कारासाठी गेले होते. हो! हे खरं आहे. स्वत: अभिनेत्याने त्याचा हा प्रसंग सांगितला आहे आणि हे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे चंकी पांडे. चंकी पांडेंनी त्यांच्या संघर्षाच्या काळात पैशांसाठी एका अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. नेमका काय आहे हा किस्सा? चला जाणून घेऊ.

बॉलीवूड बबलबरोबरच्या संवादात चंकी पांडे म्हणाले, “हो मी अंत्यसंस्काराला गेलो होतो. पण ते मी ठरवून नाही; तर चुकून गेलो होतो. तेव्हा कलाकारांकडे उत्पन्नाचे फार पर्यायी स्रोत नव्हते. आतासारखा सोशल मीडिया नव्हता. इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूब वगैरे काही नव्हतं. जाहिरातीसुद्धा नव्हत्या. म्हणून कलाकार फक्त चित्रपट आणि काही कार्यक्रमांना उपस्थित राहून पैसे कमवू शकत होते.”

यापुढे ते म्हणाले, “एके दिवशी मला कार्यक्रमाच्या आयोजकाचा फोन आला होता आणि त्याने त्याला दहा मिनिटांसाठी एका ठिकाणी काम आहे असं सांगितलं. त्यावर मी त्याला ‘ठीक आहे’ असं म्हटलं आणि त्याने येताना मला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून येण्यास सांगितलं. कुठे यायचं याबद्दल त्याने मला तेव्हा फोनवर काही सांगितलं नव्हतं. जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा बाहेर खूप गर्दी दिसली आणि सर्वांनीच पांढरे कपडे घातले होते.”

यापुढे चंकी पांडे म्हणाले, “मी आत गेलो; तेव्हा मला तिथे एक मृतदेह पडलेला दिसला. त्यामुळे मला वाटलं की, आयोजकाचं निधन झालं आहे की काय. तेवढ्यात आयोजकच माझ्याकडे आला. तर मी त्याला विचारले, ‘कोणाचं निधन झालं आहे?’ त्यावर तो म्हणाला, ‘ही एक अंत्ययात्रा आहे; ज्यासाठी मी तुला बोलावलं आहे’.तेव्हा मी त्याच्यावर ओरडू शकत नव्हतो; कारण मी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी होतो आणि माझ्यासमोर मृतदेह होता.”

यापुढे चंकी पांडेंनी सांगितलं की, “तो आयोजक मला म्हणाला, ‘जर तू रडलास तर मी तुला जास्त पैसे देईन’. मी फार भावुक व्यक्ती नसल्याने मी ते करणं नाकारलं. पण माझ्याबरोबर गेलेला दुसरा अभिनेता खूप रडला, ज्यामुळे त्याला ५०,००० रुपये जास्त मिळाले.” यानंतर चंकी पांडेंनी यामागचं नेमकं कारणही सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल चंकी पांडे म्हणाले, “ज्याचा मृत्यू झाला होता, त्याच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना भिती होती की, कर्जदार येतील आणि पैसे मागतील. मग त्यांना पैसे परत करावे लागतील. त्यामुळे कुटुंबियांनी अशी अफवा पसरवली की, त्याने (मृत व्यक्ती) एक चित्रपट तयार केला होता आणि त्यात त्याचे सर्व पैसे गेले. त्यामुळे तेव्हा तो चित्रपटाची निर्मिती करत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी काही कलाकारांना तिथे बोलावण्यात आलं होतं.”