अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याला मिळालेलं अटक वॉरंट. पंजाबचे लुधियाना ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांनी हे अटक वॉरंट दिलं आहे. सोनू सूदला अटक वॉरंट जारी होताच मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. अशात आता सोनू सूदने स्वत: या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनू सूदने त्याच्या एक्स (ट्वीटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलं आहे, “आम्हाला हे स्पष्ट करणे महत्वाचे वाटते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येत असलेल्या बातम्या अत्यंत खळबळजनक आहेत. साध्या भाषेत सांगायचं झालं तर, आमचा या प्रकरणाशी प्रत्यक्षात कोणताही संबंध नाही. माननीय न्यायालयाने आम्हाला तृतीय पक्षाशी संबंधित प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून बोलावले होते. आमच्या वकिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच १० फेब्रुवारी २०२५ रोजी आम्ही या प्रकरणात आमचा सहभाग नसल्याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण देणारे निवेदन सादर करू.”

आम्ही कठोर कारवाई करू

सोनू सूदने या प्रकरणी दु:खद भावना व्यक्त करत योग्य ती कारवाई केली जाईल असंही पोस्टमध्ये लिहिलं आहे. “आम्ही ब्रँड ॲम्बेसेडर नाही आणि आमचा या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंधत नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या खळबळजनक बातम्या फक्त लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आहेत. कलाकारांना अशाप्रकारे सॉफ्ट टार्गेट करणे हे खरोखर दु:खद आणि वेदना देणारे आहे. याप्रकरणी आम्ही कठोर आणि योग्य ती कारवाई करू”, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

अटक वॉरंट का दिलं?

पंजाबच्या लुधियाना कोर्टात १० लाखांच्या फसवणुकीचा एक खटला सुरू आहे. या प्रकरणी साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी सोनू सूदला समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, वारंवार समन्स बजावूनही सोनू सूद तेथे हजर राहिला नाही. त्यामुळे लुधियाना ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांनी अटक वॉरंट जारी करत सोनू सूदला कोर्टात हजर करण्यास सांगितलं आहे.

करोना काळात सोनू सूदने अनेक गरजू व्यक्तींना सढळ हाताने मदत केली. यामुळे सामान्य नागरिकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला. तसेच त्याच्या चहत्यांमध्येही मोठी भर पडली. सोनू सूदला त्याच्या अभिनयासह चांगल्या कामांसाठीही ओळखलं जातं. त्याच्याविषयी अशी माहिती समजल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलयचे झाल्यास, तो नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फतेह’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याने फतेह सिंग हे पात्र साकारलं आहे. बॉलीवूडच्या ‘दबंग’ या चित्रपटात सोनू सूदने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने सोनू मोठ्या प्रसिद्धीझोतात आला.