Bollywood Actor Sunil Shetty : सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेक चुकीच्या घटना घडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांचे अनेक फोटो-व्हिडीओ चुकीच्या पध्दतीनं व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. डीपफेक फोटो-व्हिडीओमुळे तर अनेक अभिनेत्रींना त्रास सहन करावा लागला आहे. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी कायदेशीररित्या तक्रारसुद्धा केली आहे.
अशातच आता बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांचे फोटो-व्हिडीओ परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीनं वापरली जात असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही वेबसाईट्स आणि सोशल मीडिया पेजेस त्यांच्या फोटोचा वापर व्यावसायिक उद्दिष्टांसाठी करत आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे.
या प्रकरणात सुनील शेट्टी यांनी अशा सर्व वेबसाइट्सना त्यांचे फोटो-व्हिडीओ काढून टाकण्याचे आणि भविष्यात त्याचा असा चुकीचा वापर न करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.
न्यायालयात काय घडलं?
न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सुनील शेट्टी यांचे वकील बीरेंद्र सराफ यांची बाजू ऐकून घेतली आणि आदेश राखून ठेवला. सुनील शेट्टी यांचे वकील बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयात सांगितले की, सुनील शेट्टी आणि त्यांच्या नातीचे म्हणजेच आथिया शेट्टी आणि जावई क्रिकेटपटू के. एल. राहुल यांची मुलगी इवाराचे बनावट फोटो काही वेबसाईट्सवर शेअर करण्यात आले आहेत.
याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, रिअल इस्टेट एजन्सीच्या वेबसाइटवर सुनील शेट्टी यांचे फोटो वापरले गेले आहेत. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
सुनील शेट्टी यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करणारे काही बनावट एजंट सध्या सक्रीय आहेत, जे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्यांच्या नावाचा वापर करत आहेत. तसंच त्यांच्या नावावर बनावट सोशल मीडिया अकाऊंट्सही तयार करण्यात आले आहेत.