Deepika Padukone Talk About Exit From Spirit and Kalki : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही काही महिन्यांपासून तिच्या आठ तास कामांच्या मागणीमुळे चर्चेत आहे. या मागण्यांमुळे तिनं संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की 2898’ या सिनेमांमधून एक्झिट घेतली. या सिनेमांमधून तिला काढून टाकण्यात आल्याचंही अनेक वृत्तांमधून समोर आलं होतं. याबाबत तेव्हा दीपिकानं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र, आता तिनं या सगळ्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
दीपिका मध्य प्रदेशात आपल्या ‘Live Love Laugh’ या मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्या कार्यक्रमात तिनं अप्रत्यक्षपणे आपल्या चित्रपटांमधून बाहेर पडण्याबद्दल सुरू असलेल्या वादांना उत्तर दिलं. CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी हे पूर्वीही अनेक वेळा केलं आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन नाही.”
पुढे ती सांगते, “मानधनाच्या बाबतीतसुद्धा मला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. पण, मी नेहमी शांतपणे आणि सन्मानानं माझा संघर्ष करत आले आहे. काही वेळा ते उघडपणे समोर येतात, जे मला अजिबात मान्य नाही. मला जसं शिकवलं गेलंय, तसं मी हे शांतपणे हाताळते.”
त्यानंतर दीपिकानं सांगितलं, “मी अशी पहिलीच नाही, जी आठ तासांच्या कामाची मागणी करतेय. अनेक पुरुष कलाकार अनेक वर्षांपासून हेच करुत आहेत; पण ते कधी चर्चेचा विषय झाले नाहीत. अनेक पुरुष कलाकार गेल्या कित्येक वर्षांपासून आठवड्यातून पाच दिवस, फक्त आठ तास काम करतात. ते शनिवार-रविवारी कामच करीत नाहीत.”
दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम पोस्ट
तसेच पुढे दीपिकानं हेही नमूद केलं, “मी चांगल्या कामाबद्दलच्या अटी, चांगलं वर्क-लाईफ बॅलन्स यासाठी उभी आहे. जर हे कोणाला मंजूर नसेल, तर ठीक आहे. कुणालाच हे बंधनकारक नाही.”
दरम्यान, दीपिकाच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती लवकरच शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात शाहरुखची मुलगी सुहाना खानसुद्धा आहे.