Neena Gupta Share Memory of Laxmikant Berde : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरी चप्पलेबद्दल सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने त्यांच्या स्प्रिंग/समर २०२६ फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलसारखीच डिझाइन असलेली ‘टो रिंग सँडल्स’ सादर केली, ज्यामुळे कोल्हापुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चप्पलची कॉपी केल्याची प्राडावर टीका करण्यात आली.
प्राडाकडून करण्यात आलेल्या कोल्हापुरी चप्पलेच्या कॉपीवर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. नुकतंच अभिनेत्री करीना कपूरनेही कोल्हापुरी चप्पलेचा फोटो शेअर करत आणि ‘सॉरी ही प्राडा नाही, माझी ओरिजनल कोल्हापुरी आहे” असं म्हटलं होतं. अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही कोल्हापुरी चप्पलसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या विविध लूक्समधील फोटो शेअर करत असतात, ज्यांची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत असते. अशातच आता त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी कोल्हापुरी चप्पलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही चप्पल त्यांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंनी भेट म्हणून दिली होती.
नीना गुप्ता इन्स्टाग्राम व्हिडीओ
कोल्हापूरी चप्पल घातल्याचा व्हिडीओ शेअर करत नीना गुप्ता असं म्हणतात, “आजकाल कोल्हापुरी चप्पल ही चांगलीच चर्चेत आहे. मी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर एका प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. जाहिरात की काही तरी होतं, मला आता नेमकं आठवत नाहीय. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही मला कोल्हापूरवरून कोल्हापुरी चप्पल आणून द्याल का? तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मला ही कोल्हापुरी चप्पल आणून दिली होती.”
यानंतर नीना गुप्तांनी सांगितलं, “माझ्याकडची ही आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर आणि हातांनी बनवलेली अशी चप्पल आहे. यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मीकांत… तुम्ही आता आमच्याबरोबर नाही, पण तुम्हाला खूप खूप प्रेम.” दरम्यान, नीना गुप्ता यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
“कोल्हापुरी हा आमचा खरा अभिमान आहे आणि लक्ष्मीकांत हे या इंडस्ट्रीतला एक खजिना”, “जगात भारी कोल्हापुरी”, “खूप सुंदर” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांसह बेर्डेंच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डेंनीसुद्धा या व्हिडीओवर कमेंट केली आहे. प्रिया यांनी “नमस्कार नीना मॅम, लक्ष्मीकांत यांना तुमच्या आठवणीत ठेवल्याबद्दल धन्यवाद” असं म्हटलं आहे.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. विनोदी भूमिकांसह त्यांच्या आशयघन भूमिकांमुळे ते मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवलेल्या लक्ष्मीकांत यांच्याबद्दलचे अनेक जुने किस्से आणि आठवणी अनेक कलाकार व्यक्त करत असतात. अशातच नीना यांनीसुद्धा त्यांनी दिलेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.