Bollywood Director Reveals Threats By Salman Khan And Family : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा दिग्दर्शक अभिनव कश्यप चांगलाच चर्चेत आहे दबंग फेम अभिनव गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसह त्याच्या कुटुंबियांवर अनेक आरोप करत आहे. याआधीही अनेक वेळा त्यान सांगितलं होतं की, त्याला चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अनेक अपमान सहन करावे लागले. अशातच आता पुन्हा एकदा त्याने पुन्हा आपलं म्हणणं मांडलं आहे.
‘दबंग’च्या चित्रीकरणादरम्यान त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. चित्रपट यशस्वी झाल्यानंतर खान कुटुंबाकडून श्रेय काढून घेण्यात आलं, तसंच पैसेही थकवण्यात आले, असा आरोप त्याने केला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ‘बॉलीवूड ठिकाणा’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनव म्हणाला, “चित्रपट यशस्वी झाल्यानंतर मीडिया रिपोर्ट्समधून मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला. निर्माते मला विचारात घेत नव्हते. मला याचा फटका बसला. ‘दबंग’चे क्रेडिट्स बघा. सलमानचं नाव माझ्या नावाआधी टाकलं आहे. अरबाजचं नाव टायटलच्यावर आहे. माझ्या नावाचा फाँट लहान केला होता. हे सगळं ठरवून केलं गेलं होतं.”
५१ लाख रुपये थकले होते; २१ लाखांची गाडी देऊन मोठेपणा दाखवला : अभिनव कश्यप
अभिनव कश्यप म्हणाला, “माझ्याकडे ५१ लाख रुपये बाकी होते. त्यातील २१ लाख रुपये त्यांनी गाडीच्या रूपात दिले. असं केल्यामागचं कारण म्हणजे, अरबाज खानला ‘उदार’ दाखवायचं होतं. पण प्रत्यक्षात, मला दोन वर्षे काहीही पैसे मिळाले नव्हते. मी कर्जबाजारी झालो होतो.”
मी बोलायला लागल्यावर धमक्या यायला लागल्या : अभिनव कश्यप
“जेव्हा एका पत्रकाराने माझ्याकडे प्रतिक्रिया मागितली, तेव्हा मी पहिल्यांदा खान कुटुंबाबद्दल स्पष्टपणे बोललो. त्या वेळेस ‘दबंग २’बाबत सुरुवातीच्या चर्चा चालू झाल्या होत्या. मी बोलताच मला अरबाजचा फोन आला. तो म्हणाला, ‘सर, तुम्ही का बोलताय? अश्विनने मला फोन करून सांगितलं की, ‘तुझा दिग्दर्शक खूप बोलतोय… त्याला आम्ही धडा शिकवू.’ अभिनवला ‘अश्विन’ कोण हे आठवत नव्हतं. त्यामुळे त्याने अरबाजला फक्त एवढंच उत्तर दिलं की, “अरबाजभाई, जर कोणी असं म्हटलं की, तू आपल्या मुलाचा – अरहानचा – बाप नाहीस, तर तुला वाईट वाटणार नाही का?” ते ऐकून अरबाजने फोन कट केला.”
“१५ वर्षांपासून कोणीही संपर्क साधलेला नाही”
यापुढे अभिनव म्हणतो, “माझी बदनामी करणारे लेख जेव्हा येत होते, तेव्हा मी त्यावर उत्तरं देत होतो. पण त्यानंतर मला प्रत्येकवेळी अरबाजचा फोन यायचा. माझं श्रेय नाकारण्यात आलं. मी रोज अपमान सहन करत होतो. गेले १५ वर्ष त्यांच्यापैकी कोणत्याही व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधलेला नाही.”
दरम्यान, ‘दबंग’ चित्रपटाच्या १५ व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘स्क्रीन’ला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत अभिनवने सलमानवर टीका करत म्हटलेलं की, “तो स्टार सिस्टमचा बाप आहे. त्यांचं कुटुंब ५० वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे. ते सूड घेणारे लोक आहेत. जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, तर ते तुम्हाला टार्गेट करतात.”