Rajat Bedi Recalls His Struggle : बॉलीवूड आणि नेपोटिझम (घराणेशाही) कायमच चर्चेतले मुद्दे आहेत. बॉलीवूडमध्ये नेपोटिझम असून यामुळे अनेक नवख्या कलाकारांना डावललं जात असल्याच्या चर्चा अनेकदा होताना दिसतात. नेपोटिझममुळे बॉलीवूडमध्ये अनेक स्टारकिड्सना सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, सगळेच स्टारकिड्स याबाबत नशीबवान असतात असं नाही.

स्टारकिड्स असूनही काहींना बॉलीवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. असाच काहीसा अनुभव अभिनेता रजत बेदीला आला होता. २००० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारत रजत बेदीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपल्या नानाविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा रजत मध्यंतरीच्या काळात इंडस्ट्रीपासून काहीसा दूर होता. त्यानंतर आता तो आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रजत बेदी, प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचा मुलगा आणि ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक राजिंदर सिंग बेदी यांचा नातू आहे, तरीही त्याला बॉलीवूडमध्ये अपेक्षित असं यश मिळालं नाही. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत रजतनं वडिलांचं निधन झाल्यानंतर इंडस्ट्रीतल्या कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं.

सिद्धार्थ कन्ननबरोबरच्या संभाषणात वडिलांच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल रजत बेदी म्हणाला, “मी फक्त नऊ वर्षांचा होतो, जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं. मला स्पष्ट आठवतंय, वडिलांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमधून कोणीच कसलीच मदत केली नाही. फक्त प्रकाश मेहरा आणि त्यांचे कुटुंबीय आमच्या मदतीला आले. वडिलांच्या निधनानंतर, एक वर्ष त्यांनी आम्हाला पैसे पाठवले. तसंच त्यांनी माझ्या आईला ‘काही काळजी करू नका’ असं म्हणत भावनिक आधार दिला होता. पण, बाकी कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही.”

पुढे रजतने सांगितलं, “एक दिवस आईने विचारलं, ‘आता तू पुढे काय करणार?’ तेव्हा मी खूप गोंधळलेलो होतो. मग तिने स्वतः जाऊन रमेश सिप्पी यांच्याशी बोलून मला त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम मिळवून दिलं, मी तेव्हा १८ वर्षांचा होतो. ‘जमाना दिवाना’ या शाहरुख खानच्या चित्रपटात मी त्यांच्या टीममध्ये काम केलं. त्याच काळात शाहरुख आणि माझी मैत्री झाली. आम्ही जवळपास दोन-अडीच वर्ष एकत्र काम केलं. तो मला ‘टायगर’ म्हणायचा, कारण सेटवर दोन रजत होते आणि मी जरा आक्रमक स्वभावाचा होतो.”

रजत बेदी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर रजत म्हणाला, “आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या खास प्रीव्ह्यूसाठी मी शाहरुखच्या घरी गेलो होतो. काही जवळच्या लोकांना त्याने आमंत्रित केलं होतं. स्क्रीनिंगच्या आधी शाहरुखने छोटंसं भाषण केलं, त्यात त्याने माझं नाव घेतलं आणि म्हणाला, “आणि टायगरही या प्रोजेक्टचा भाग आहे”, तेव्हा मी चकित झालो. शाहरुखला अजूनही माझं ‘टायगर’ नाव माहीत आहे, हे पाहून मी भारावलो. शाहरुख काहीच विसरत नाही.”

दरम्यान, रजत ‘दो हज़ार एक’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’, ‘इंडियन’, ‘कोई मिल गया’, ‘खामोश… खौफ की रात’ आणि ‘रॉकी द रिबेल’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखला जातो. सध्या तो त्याच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील भूमिकेसाठी चर्चेत आहे.