This Is Bollywood’s Richest Man : अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे स्वत:चा व्यवसायही करत आहेत. त्यांचे स्वत:चे ब्रँड्स आहेत तर काहींचा कौटुंबिक व्यवसायही आहे. अलीकडेच अभिनेता शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता असल्याचं समोर आलं. परंतु तुम्हाला माहीत आहे का, बॉलीवूडमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी किंग खानपेक्षाही अधिक श्रीमंत आहे.
बॉलीवूडमधील ही सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणी अभिनेता, गायक, दिग्दर्शक नसून एक निर्माता आहे; त्यांचं नाव आहे रॉनी स्क्रूवाला. रॉनी स्क्रूवाला यांची नेटवर्थ शाहरुख खानपेक्षाही अधिक आहे. चला तर जाणून घेऊयात रॉनी यांची नेटवर्थ नेमकी किती आहे आणि त्यांचे कोणते व्यवसाय आहेत.
रॉनी स्क्रूवाला यांची एकूण नेटवर्थ किती?
‘हुरुन’च्या अहवालानुसार २०२५ मधील बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रॉनी स्क्रूवाला हे प्रथम स्थानावर आहेत. रॉनी यांची नेटवर्थ जवळपास तब्बल १३,३१४ कोटी इतकी आहे. तर शाहरुख खानची नेटवर्थ १२,४९० कोटी म्हणजेच १.४ अब्ज इतकी आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार रॉनी स्क्रूवालांनी सुरुवात टूथब्रश बनवणाऱ्या कंपनीपासून केली होती. त्यानंतर त्यांनी एक मोठं पाऊल उचललं आणि UTV या प्रोडक्शन कंपनीची स्थापना केली. या कंपनीने ‘स्वदेस’, ‘लक्ष्य’, ‘रंग दे बसंती’, ‘जोधा अकबर’, ‘अ वेन्सडे’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली.
Rohinton sole हे रॉनी स्क्रूवाला याचं मूळ नाव आहे. रॉनी चित्रपट निर्माते, गुंतवणूकदार आणि उद्योजक आहेत. त्यांच्या नावाचा समावेश ‘हुरुन’च्या श्रीमंतांच्या यादीत, तसेच ‘ई स्क्वेअर’ आणि ‘टाईम्स’ मासिकांच्या जगातील प्रभावशाली लोकांच्या यादीत आहे. त्यांनी सुरू केलेली कंपनी युटीव्ही सॉफ्टवेयर कम्युनिकेशन ही 20th Century Fox, Walt Disney Company, Bloomberg यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम करत होती. नंतर त्यांनी ही कंपनी ‘डिझनी’ला १.४ अब्ज डॉलर्स (सुमारे १०,००० कोटी रुपये) ला विकली.
पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांनी RSVP Movies या नव्या कंपनीसह पुन्हा चित्रपट क्षेत्रात कमबॅक केलं. त्यांनी तयार केलेला पहिला चित्रपट होता, ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’, ज्यात विकी कौशलने काम केलं. यानंतर त्यांनी ‘लस्ट स्टोरीज’ची निर्मिती केली. रॉनी स्क्रूवाला यांनी उल्लेख केल्यानुसार अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
नुकतंच CareerSh** Advice शी संवाद साधताना रॉनी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांबद्दल सांगितलं. काही आठवडे कॉर्पोरेट कंपनीत काम केल्यानंतर त्यांना कळलं होतं की, दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं शक्य नाही. याबद्ल ते म्हणाले, “माझी पहिली नोकरी कॉपीरायटर म्हणून होती. एका जाहिरात कंपनीत मी तीन महिने काम केलं. पहिल्याच महिन्यात मला वाटलं की माझा बॉस माझ्याइतका हुशार नाहीये. दुसऱ्या महिन्यातच ठरवलं की मला दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम नाही करायचंय. मला काहीतरी स्वतःचं करायचं होतं, पण नेमकं काय हे ठरलेलं नव्हतं. मी सुरुवातीला जे २५ जण कामासाठी निवडले होते, त्यांची मुलाखत त्यांच्या आई-वडिलांनीच घेतलेली! ते सगळेच खूप चांगले होते, पण त्यांचं फक्त एक म्हणणं होती की, मी त्यांच्या पालकांना भेटून याबद्दल त्यांच्याशी सविस्तर चर्चा करावी आणि त्यांची यासाठी समजूत काढावी आणि मी ते केलं, कारण मला गरजेचं वाटलं.”
रॉनी त्यांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल पुढे म्हणाले, “आमची सुरुवात बेसमेंटमध्ये झाली. दररोज एक तास वीज जायची. सुरुवातीला काही गोष्टी माझ्या बाजूने घडल्या, पण आमचं तीन वेळा खूप मोठं नुकसान झालं. परंतु, मी कधीच कोणाला नोकरीवरून काढलं नाही, त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की जर कुणाला कामावरून काढलं तर त्यानं खरंच काहीतरी चुकीचं केलं असेल, यामुळे आमच्यात विश्वास निर्माण झाला. एवढंच काय, तर जेव्हा मी माझ्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकलो नाही, तेव्हा त्यांनी कुठलीही तक्रार न करता मलाच बाहेर नेलं आणि एक ड्रिंक घेऊन दिली.”