Singer Zubeen Garg Dies In Scuba Diving Accident: प्रसिद्ध बॉलीवूड गायक झुबीन गर्गचे निधन झाले आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन यांचा विचित्र अपघात झाला. मूळचे आसामचे असलेले ५२ वर्षीय गायक झुबीन गर्ग २० आणि २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरला गेला होता. या फेस्टिव्हलमध्ये झुबीन परफॉर्म करणार होते.
झुबीन गर्ग यांना अपघातानंतर समुद्रातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे सीपीआर देण्यात आला, पण सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता गर्ग यांचे निधन झाले.
स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, अशी माहिती सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या प्रतिनिधीने एनडीटीव्हीला दिली. “झुबीन गर्ग यांच्या निधनाची बातमी कळवताना आम्हाला खूप दुःख होत आहे. स्कूबा डायव्हिंग करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी सीपीआर देण्यात आला. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करूनही, दुपारी २.३० च्या सुमारास आयसीयूमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले,” असं नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे प्रतिनिधी अनुज कुमार बोरुआ म्हणाले.
गायक झुबीन नौटियालने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून झुबीन गर्ग यांच्या निधनाची माहिती दिली. त्याने पोस्ट करून झुबीन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
झुबीन गर्ग यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी, बंगाली व आसामी गाणी गायली. २००६ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीच्या ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या गाण्याने झुबीन गर्ग यांना लोकप्रियता मिळाली होती.