बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका त्यांच्या दिवंगत पत्नी व अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मालकीच्या चेन्नईतील मालमत्तेवर सुरू असलेल्या वादासंदर्भात आहे. बोनी कपूर यांचा आरोप आहे की, तीन व्यक्ती अवैधरीत्या या मालमत्तेवर हक्क सांगत आहेत.

‘द हिंदू’ने दिलेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, श्रीदेवींनी ही मालमत्ता १९ एप्रिल १९८८ रोजी एम. सी. संबंदा मुथलियार नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती. मुथलियार यांना तीन मुलं आणि दोन मुली होत्या. त्यांच्या कुटुंबाने फेब्रुवारी १९६० मध्ये ही मालमत्ता आपापसांत विभागून घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा श्रीदेवींनी ही जमीन पूर्णपणे कायदेशीररीत्या खरेदी केली होती.

मात्र, अलीकडेच एक महिला आणि तिची दोन मुलं या मालमत्तेवर वारसा हक्क सांगत आहेत, अशी तक्रार बोनी कपूर यांनी केली आहे. संबंधित महिलेनं दावा केला आहे की, ती मुथलियार यांच्या एका मुलाची दुसरी पत्नी आहे आणि त्यांचा विवाह ५ फेब्रुवारी १९७५ रोजी झाला होता.

परंतु, बोनी कपूर यांचा यावर आक्षेप आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या पुरुषाची पहिली पत्नी २४ जून १९९९ पर्यंत जिवंत होती आणि त्यामुळे दुसरं लग्न बेकायदार ठरतं. त्यामुळे त्या महिलेचा आणि तिच्या मुलांचा हक्क मान्य करता येणार नाही, असं बोनी कपूर यांनी न्यायालयात स्पष्ट केलं आहे.

बोनी कपूर यांनी तक्रार केली की, या तिघांनी अनेक नागरी (सिव्हिल) खटले दाखल करून, तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करून, या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सर्व ‘फसवणूक करून मिळवलेल्या वारसा हक्क प्रमाणपत्रा’च्या आधारावर केलं जात आहे. त्यामुळे तहसीलदारांनी तत्काळ हे प्रमाणपत्र रद्द करावं, अशी मागणी बोनी कपूर यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी न्यायमूर्ती एन. आनंद वेंकटरमण यांनी या तक्रारीचा विचार करण्यासाठी तहसीलदारांना चार आठवड्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.