शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचला, आणि यानंतर आता ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’च्या पुढील चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. लवकरच यामध्ये सलमान खानच्या ‘टायगर ३’ची एन्ट्री होणार आहे तर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या चित्रपटाचा पुढचा भागही याच स्पाय युनिव्हर्सशी जोडलेला असणार आहे. ‘पठाण’मध्ये याबद्दलचे काही संदर्भदेखील देण्यात आले होते.

आता या ‘वॉर २’बद्दल नवीन माहीती समोर आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी हा ‘वॉर २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द अयानने याबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटाचं नाव न घेता अयानने एका नव्या मोठ्या प्रोजेक्टबद्दल घोषणा केली आहे.

आणखी वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चे चित्रीकरण रखडले; दिग्दर्शक सुकुमार आहेत कारणीभूत, जाणून घ्या नेमकं काय झालं?

याविषयी बोलताना अयान त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला, “मी सध्या आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. एका मोठ्या युनिव्हर्सचा हिस्सा व्हायची मला संधी मिळाली आहे. चित्रपट नेमका कोणता आहे काय आहे याबद्दल योग्य वेळ येताच माहिती देईन. ही संधी म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान आहे, यातून मला शिकायला मिळणार आहे त्यामुळेच मी या प्रोजेक्टला होकार दिला आहे.” याबरोबरच आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म्स यांनी हा निर्णय घेतला असल्याचं काही सुत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : राघव चड्ढा यांच्यासह परिणीती चोप्रा लवकरच बांधणार लग्नगाठ; आधी ‘या’ अभिनेत्यांबरोबर जोडलं होतं नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतंच याच सोशल मीडिया पोस्टमधून अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘ब्रम्हास्त्र ३’बद्दलही मोठी घोषणा केली आहे. कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा पहिला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ठरला. रणबीर कपूर, आलिया भट्टबरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. ‘ब्रह्मास्त्र २’ हा चित्रपट डिसेंबर २०२६ साली प्रदर्शित होईल तर ‘ब्रम्हास्त्र ३’ हा चित्रपट लगेचच डिसेंबर २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी माहिती अयानने त्याच्या या पोस्टमध्ये दिली आहे. याबरोबरच अयानच्या ‘वॉर २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.