Chak De India Song Story : शाहरुख खानच्या काही गाजलेल्या गाण्यांपैकी एक म्हणजे, ‘चक दे इंडिया’ हे गाणं. ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता अनेक वर्षे झाली आहेत, पण तरीही सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची चाहत्यांमधील क्रेझ कायम आहे. कोणत्याही खेळाच्या विजयानंतर हे गाणं हमखास वाजतं. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवताच स्टेडियममध्ये हे गाणं वाजवण्यात आलं.

‘चक दे इंडिया’ गाणं ऐकताना देशाविषयीचं प्रेम जाणवतं. तसंच स्फूर्तीही चढते. मात्र, हे गाणं तयार करताना अनेक अडचणी आल्या होत्या. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान संगीतकार सलीम-सुलेमान यांनी या गाण्यामागची गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला या चित्रपटाचं नाव फक्त ‘चक दे’ असं ठरवण्यात आलं होतं. मात्र, यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा यांनी त्यात ‘इंडिया’ हा शब्द जोडला.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत संगीतकार सुलेमान म्हणाले, “चित्रपटाची कथा वाचून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. हा एक देशभक्तिपर सिनेमा होता, त्यामुळे गाणंही देशभक्तिपरच असावं असा आमचा विचार होता.”

सात वेळा नाकारलं गेलेलं गाणं

आज प्रत्येकाच्याच आवडीचं हे गाणं तेव्हा मात्र तब्बल सात वेळा नाकारण्यात आलं. निर्मात्यांनी अनेकवेळा सलीम-सुलेमान यांना हे गाणं बदलण्यास सांगितलं, त्यामुळे दोघंही चित्रपट सोडण्याच्या विचारात होते. पण, हा मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत.

यापुढे सलीम म्हणाले, “आदित्य चोप्रा म्हणाले होते की, ‘मला एक असं गाणं हवंय, जिथे भारत कोणतीही स्पर्धा जिंकली तरी हेच गाणं वाजलं पाहिजे. क्रिकेट असो, हॉकी असो, बुद्धिबळ असो… किंवा कोणतीही स्पर्धा असो, भारत जिंकताच संपूर्ण देश हे गाणं गुणगुणला पाहिजे. जसं जगभरात लोक ‘जुम्मा चुम्मा दे दे’वर नाचतात, तसंच काहीतरी मला हवं आहे.” हे ऐकल्यावर सलीम-सुलेमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाण्यातून प्रेरणा घेतली आणि ‘चक दे’ हा शब्द दोनदा वापरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार महिने काहीच सुचत नव्हतं, पण आदित्य चोप्रा यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर केवळ दोन तासांत हे गाणं तयार झालं!

यापुढे संगीतकार सलीम म्हणाले, “’चक दे इंडिया’ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वात कमी ओपनिंग करणारा सिनेमा होता. पण, भारताने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध T-20 वर्ल्ड कप फायनल जिंकल्यावर जेव्हा त्या सामन्यात हे गाणं वाजलं, तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे मोर्चा वळवला. त्या गाण्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता प्रचंड वाढली.”