आमिर खानचा ‘३ इडियट्स’ २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांनाच प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लेखक चेतन भगत यांनाही प्रसिद्धी मिळवून दिली. हा चित्रपट २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्या कादंबरी ‘फाइव्ह पॉइंट समवन’ वर आधारित होता. ‘३ इडियट्स’ प्रदर्शित होईपर्यंत चेतन भगत एक प्रसिद्ध लेखक बनले होते. त्यावेळी त्यांनी फक्त तीन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यांच्या ‘२ स्टेट्स’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबऱ्यांवरही चित्रपट आले आहेत.
कुशल लोढा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना चेतन भगत यांनी त्यांच्या पहिल्या कादंबरीने चित्रपट निर्मात्यांचे लक्ष कसे वेधले त्याबद्दल सांगितलं. त्या कादंबरीच्या लोकप्रियतेमुळे त्यांना पूर्णवेळ लेखन करण्याचा आत्मविश्वास मिळाला. ३ इडियट्सना चित्रपटाचे हक्क विकण्याबद्दल भगत म्हणाले, “आम्ही ३ इडियट्ससाठी १ लाख रुपयांचा करार केला, ज्यावर १० लाखांच्या बोनसचा करार करण्यात आला होता. आणि चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी मला तो बोनस दिला.”
वाटलं नव्हतं की आमिर खान हा चित्रपट करेल – चेतन भगत
३ इडियट्सची निर्मिती ५५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. तर जगभरात या सिनेमाने ३५० कोटी रुपये कमावले होते. यापैकी चेतन भगत यांना ११ लाख रुपये देण्यात आले होते. या कराराबद्दल स्पष्टीकरण देताना भगत म्हणाले, “मी तेव्हा अगदी नवीन होतो. नंतर, कादंबऱ्यांचे असे हक्क कोट्यवधींना विकले जाऊ लागले. पण जेव्हा मी ३ इडियट्ससाठी हक्क विकले तेव्हा मला चित्रपट बनेल की नाही हे मला माहित नव्हतं. कारण ती कथा वेगळी होती. हा सिनेमा आमिर खान करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ते सगळं पाहता त्यावेळी मला बऱ्यापैकी पैसे मिळाले, असं मला वाटतं. चित्रपटाच्या कमाईच्या तुलनेत मला मिळालेली रक्कम खूप कमी वाटते, पण त्या परिस्थितीत ती योग्य होती, असं मला वाटतं.”
सैफला मिळालेले २५ लाख
त्या काळातील कलाकारांच्या मानधनाचा उल्लेख करून चेतन भगत म्हणाले, “त्या वेळी विधु विनोद चोप्रा ‘परिणीता’ चित्रपट बनवत होते. मी आकडेवारी खात्रीने सांगू शकत नाही पण त्या चित्रपटातील मुख्य अभिनेता सैफ अली खानला २५ लाख रुपये मानधन मिळाले होते. त्यामुळे, त्या तुलनेत ३ इडियट्स सारख्या हिट चित्रपटासाठी ११ लाख रुपये मला मिळणं बरोबर वाटतं.”
चेतन भगत यांचं पुस्तक २००४ साली आलं. त्याने पुस्तकाचे हक्क २००५ साली विकले आणि चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला. त्यावेळी ते बँकेत काम करत होती. त्यानंतर भगत यांच्या 2 स्टेट्स व हाफ गर्लफ्रेंडवर चित्रपट बनले. मानधनाबदद्दल ते म्हणाले, “पुस्तकाचे हक्क एका निश्चित रकमेत विकले जातात. त्याची थोडी रक्कम आगाऊ मिळते. थोडी रक्कम स्टुडिओने चित्रपटाला हिरवा कंदिल दिल्यावर मिळते आणि उरलेली रक्कम रिलीजच्या आधी मिळते. हे सगळं आधीच ठरलेलं असतं.”