बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल | complaint filed against paresh rawal for controversial statement on bengali people at gujrat | Loksatta

बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल

या वक्तव्यामुळे सध्या त्यांच्यावर सडकून टीका होताना दिसत आहे

बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल
परेश रावल गुजरात भाजपा प्रचार सभेत सहभागी (फोटो : सोशल मीडिया)

गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचारादरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेते परेश रावल हे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर याबद्दल प्रचंड वातावरण तापलं असून परेश यांच्या या विधनाची लोकांनी टीका केली आहे. शिवाय हे वक्तव्य बंगाली लोकांचा अपमान करणारं असल्याचाही काही लोकांनी दावा केला आहे.

परेश रावल यांचं वादग्रस्त वक्तव्य कोणतं?

गुजरातच्या वलसाड परिसरात भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी परेश रावल उभे होते आणि यावेळीस त्यांनी महागाई, बेरोजगारी, बेकायदेशीर विस्थापित लोकांबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे ते चर्चेत आले. परेश त्यांच्या भाषणात म्हणाले, “सध्या गॅस सिलेंडर महाग आहे, त्याची किंमत कमी होईल, लोकांना रोजगार मिळेल. गुजरातमधील जनता महागाईचा सामना करेल. पण समजा बाजूच्या घरात रोहिंग्या शरणार्थी किंवा बांगलादेशी आले तर त्या स्वस्त गॅस सिलेंडरचं काय करणार? त्या बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?”

परेश यांच्या या वक्तव्यामुळे सध्या त्यांच्यावर जबरदस्त टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोक निषेध करत आहे. एका समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अशी जहरी टीका होत असल्याचं सोशल मीडियावर म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : “गॅस सिलिंडर दिला तर बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?”, परेश रावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाली नाराज

परेश यांनी मागितली माफी :

सोशल मीडियावर लोक व्यक्त होत असल्याने याविषयी परेश रावल यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. परेश यांनी ट्वीट करत त्यांनी बाजू मांडली आहे. ते म्हणतात, “मासे खाणं हा मुद्दा अजिबात नाही. गुजराती लोकसुद्धा मासे शिजवतात आणि खातात. पण मी बंगाली फक्त अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनाच संबोधून म्हणालो आहे. तरी मी तुमचं मन आणि भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

परेश यांनी माफी मागूनही प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. पश्चिम बंगालच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेता मुहम्मद सलीम यांनी परेश रावल यांच्याविरोधात कलकत्ताच्या तलतला येथील पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. परेश रावल हे त्यांच्या भाषणातून दंगे भडकवण्याचं काम करत आहेत शिवाय बंगाली लोकांबद्दलची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत असं सलीम यांनी या तक्रारीत नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 12:10 IST
Next Story
रणवीर सिंगने सर्वांसमोर सिद्धार्थ जाधवला धक्का दिला अन्… पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ