Coolie box office collection day 4: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी हे चाहते खूप उत्सुरक असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. इंडस्ट्रीमध्ये थलाईवा, अशी ओळख असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेl.

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला कुली हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून चर्चेत होता. चेन्नईतील एका थिएटरमध्ये एक तिकीट ४,५०० रुपयांना दिले जात होते. विशेष म्हणजे तिकिटाचे दर इतके वाढूनही रजनीकांत यांच्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी चाहत्यांनी ही महागडी तिकिटेही खरेदी करताना मागे-पुढे पाहिले नाही, असे समोर आलेल्या माहितीमधून स्पष्ट झाले.

आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. रजनीकांत यांचा हा चित्रपट खूप वेगाने कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. जाणून घेऊयात ‘कुली’ या चित्रपटाने चार दिवसांत एकूण किती कमाई केली आहे.

‘कुली’ आणि ‘वॉर २’ ची एकूण कमाई किती?

सॅल्कनिकनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६५ कोटींची कमाई केली. दुसर्‍या दिवशी या चित्रपटाने ५४. ७५ कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३९.५ कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने भारतात एकूण १९३.२५ कोटींची कमाई केली आहे.

जागतिक स्तरावरदेखील या चित्रपटाला मोठे यश मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर अमेरिकेतील चित्रपटांना रजनीकांत यांचा ‘कुली’ टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने संपू्र्ण जगभरात ४५.३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ३९७ कोटींची कमाई केली आहे.

कुली हा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला, त्याच दिवशी ‘वॉर २’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता ज्युनिअर एनटीआर हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १७३.६० कोटींची कमाई केली आहे. तर, संपूर्ण जगभरात या चित्रपटाने ३१.५२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २७६.५ कोटींची कमाई केली आहे, जी ‘कुली’ चित्रपटापेक्षा कमी आहे.

आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.