Deepika Padukone AI Assistant Voice : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय ठरली आहे. मेटा एआय हा मेटाच्या इकोसिस्टममधील व्हर्च्युअल असिस्टंट आहे, ज्यात रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश आहे. दीपिका आता या एआय असिस्टंटला आवाज देणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत हॉलीवूड स्टार अवक्वाफिना आणि जुडी डेंच यांच्या नावांचा समावेश आहे.

भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडमधील एआय युजर्स आता दीपिकाच्या आवाजातील मेटा एआयशी बोलू शकतील. दीपिकाचा आवाज इंग्रजीत उपलब्ध असेल, असं मेटाने जाहीर केलं आहे. त्याचबरोबर कंपनीने हिंदी भाषा आणि यूपीआय लाइट पेमेंट सुरू केलं आहे, त्यामुळे युजर्सचा अनुभव आणखी चांगला होईल.

दीपिका जगभरात विनम्रपणा, साधेपणा आणि फॅशनसाठी ओळखली जाते. सामाजिक विषय व मानसिक आरोग्याबद्दल स्पष्टपणे मतं मांडणाऱ्या दीपिकाने आता डिजिटल जगात पाऊल ठेवलंय. युजर्स आता एआय असिस्टंटशी दीपिकाच्या आवाजात बोलू शकतील. एआय असिस्टंटचे आवाज कृत्रिम वाटतात, पण दीपिकाचा आवाज म्हणजे एआयला खऱ्या मानवी आवाजाचा स्पर्श देतो. त्यामुळे युजर्सचा संवाद व अनुभव आणखी समृद्ध होईल.

एआय असिस्टंटचा वापर करणारे लाखो लोक दीपिकाच्या आवाजात एआयकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतील. मेटाने दीपिकाची केलेली निवड ही जागतिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.

दीपिकाने चित्रपटांपलीकडे डिजिटल जगात तिचा प्रभाव वाढवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. तिच्या करिअरमधील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मातृत्वानंतर चित्रपटांपासून दूर असलेली दीपिका आता एआय असिस्टंटच्या आवाजात चाहत्यांशी कनेक्ट करेल.