Deepika Padukone Talks About Daughter Dua : दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपिकाने अनेक चित्रपटांत काम करत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच तिने हिजाब परिधान केल्यामुळे ती ट्रोल झाली. त्यापूर्वी दिवसाला फक्त ८ तास काम करण्याच्या मागणीमुळेही अभिनेत्राला काहींनी विरोध केला होता, यामुळे अभिनेत्री बरीच चर्चेत होती.

दीपिकाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या लेकीबद्दल सांगितलं आहे. CNBC ला दिलेल्या मुलाखतीत तिने मातृत्वाबद्दल आणि तिच्या लेकीबद्दलही सांगितलं आहे. या मुलाखतीत तिने मानसिक आरोग्याची काळजी घेणे व त्याचं महत्त्व याबद्दलही सांगितलं आहे.

मला आई व्हायचं होतं – दीपिका पादुकोण

मातृत्वाबद्दल दीपिका म्हणाली, “मी कायम खूप संयमी स्वभावाची व्यक्ती आहे. मी इतरांमध्ये फार कधीच रुळले नाही. पण, आता मला इतर पालकांबरोबर आणि प्लेस्कूल या गोष्टींसाठी संवाद साधावा लागतो. मातृत्व तुम्हाला तुमच्या कंफर्टझोनच्या बाहेर जाऊन गोष्टी करायला भाग पाडतं. मला कायम आई व्हायचं होतं आणि आता मी माझी आवडती भूमिका साकारत आहे.”

मानसिक आरोग्याबद्दल दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

दीपिकाने या मुलाखतीत मानसिक आरोग्याबद्दलही सांगितलं आहे. याबद्दल ती म्हणाली, “झोप खूप महत्त्वाची आहे. मी हे प्रत्येक मुलाखतीत सांगते, त्यामुळे मला खात्री आहे की लोकांना हे ऐकून आता बोअर होत असेल. पण हे सत्य आहे. झोप, व्यायाम, योग्य आहार या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.” यावेळी तिने योग्य आहाराबद्दल बोलताना भारतीय जेवण हे यावर उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

दीपिका पुढे म्हणाली, “मला माझ्या फोनची अजिबात सवय नसून मी कितीही वेळ फोनशिवाय राहू शकते. मी एका जाग्यावर बसू शकत नाही. मला काहीतरी करायचंच असतं. अनेकदा मी साफ सफाई करते. पण, हे करणं गरजेचं आहे असं काही नाही. मला ओसीडी असल्याने ही माझी पद्धत आहे.”

दीपिका व रणवीर सिंह यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केलेलं. लग्नाच्या साडे पाच वर्षांनंतर त्यांच्या मुलीचा दुआचा जन्म झाला. नुकताच त्यांच्या मुलीचा त्यांनी पहिला वाढदिवस साजरा केला. लेकीच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा कामावर परतली असून अभिनेत्री शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटातून झळकणार आहे.