Deepika Padukone Trolled For Wearing Hijab : दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री चर्चेत आली ते संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून झालेल्या तिच्या एक्झिटमुळे. त्यावेळी तिने दिवसाला फक्त ८ तास काम करण्याची मागणी केल्याने अनेकांनी यावर त्यांची मतं व्यक्त केली, तर काहींनी तिला यासाठी विरोध केला. अशातच आता अभिनेत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दीपिकाने हिजाब परिधान केल्याने ती ट्रोल होत आहे. दीपिकाने हिजाब परिधान केल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय; पण नेमकं काय घडलं, दीपिकाने हिजाब का परिधान केलाय जाणून घेऊयात… दीपिका व रणवीर सिंह अबूधाबी येथे गेले असताना त्यावेळचा एक व्हिडीओ रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. रणवीर व दीपिका नुकतेच एका जाहिरातीत झळकले, जी अबूधाबी येथील संस्कृती आणि पर्यटन विभागाअंतर्गत करण्यात आली आहे. याच जाहिरातीचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला त्याने ‘मेरा सुकून’ अशी कॅप्शन देत खाली अबूधाबी असं हॅशटॅग दिली आहे.

हिजाब परिधान केल्याने दीपिका पादुकोण ट्रोल

या जाहिरातीत दीपिकाने हिजाब परिधान केल्याचं पाहायला मिळतं, ज्यामुळे अभिनेत्रीला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एक्सवर एकाने दीपिका रणवीरचा हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला “दीपिका पादुकोणने पूर्वी टिकली लावायची की नाही हा माझा निर्णय आहे असं म्हटलेलं. मग जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर हिजाब घालून जाहिरात करत असाल तर ते थांबवायला हवं. टिकली लावायची की नाही हा जर तुमचा निर्णय असेल तर तुम्ही याचीही जाहिरात का करत आहात,” अशी कॅप्शन दिली आहे.

अजून एका नेटकऱ्याने दीपिका रणवीरच्या या व्हिडीओबद्दल एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “हे लोक तिकडे जातात तेव्हा पूर्णपणे मुस्लीम पद्धतीचा पोशाख परिधान करतात; पण एरवी ते चित्रपटात मात्र छोट्या कपड्यांमध्ये पाहायला मिळतात.” यासह काहींनी दीपिकाची बाजूदेखील घेतलेली पाहायला मिळतेय. काहींनी तिचे मंदिरातील फोटो शेअर केले असून ती जेव्हा मंदिरात जाते तेव्हा साडी, ड्रेस परिधान करते असंही म्हटलं आहे.

कपड्यांवरून दीपिका पहिल्यांदाच ट्रोल होत नसून यापूर्वीसुद्धा ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल करण्यात आलेलं. दीपिकाने अद्याप हिजाबवरील ट्रोलिंगबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीये.