भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला असून दोघेही आता विभक्त झाले आहेत. २२ डिसेंबर २०२० रोजी युजवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते. पण २०२३ मध्ये धनश्री-चहलच्या नात्यात तेढ निर्माण झाल्याचं समोर आलं. अखेर २० मार्चला दोघांच्या संमतीने त्यांचं नातं संपुष्टात आलं. घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
अशातच तिने घटस्फोट घेतल्यानंतरच्या परिस्थितीवर नुकत्याच एका मुलाखतीत तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत धनश्रीने घटस्फोट घेतल्यानंतरच्या टीका व ट्रोलिंगबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. याबद्दल धनश्री म्हणाली, “नकारात्मकता आणि सोशल मीडियावरील टीका मला कधीही त्रास देत नाहीत. मी एक मेहनती व्यक्ती आहे.”
यापुढे तिने सांगितलं की, “या काळात मी स्वत:वरील प्रेम, शिस्त, व्यायाम आणि चांगलं अन्न यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी माझी जीवनशैली पूर्णपणे बदलली. मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझा आदर करणाऱ्या लोकांमध्ये राहते.” यानंतर तिने मी ज्या आव्हानांना तोंड दिले आहे; त्यामुळे मला स्वत:ला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यास मदत झाल्याचंही म्हटलं. याबद्दल ती म्हणाली, “कठीण काळ येतो. परंतू, कलेबद्दलची आवड मला खंबीर राहण्यास मदत करते.”
यापुढे धनश्री म्हणाली, “मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वावलंबनाचे महत्त्व. माझ्या पालकांनी मला नेहमीच खंबीर मुलगी म्हणून वाढवलं आहे. मला माझ्याबद्दलचे कोणतेही गैरसमज स्पष्ट करण्यात मला आता रस नाही. कारण त्यामुळे फक्त आणि फक्त अधिक तर्क-वितर्क काढले जातात. हे तर्क-वितर्क माझ्या कामाबद्दलचे असावेत असं मला वाटतं. सध्या मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”
दरम्यान, धनश्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. धनश्री उत्तम नृत्यांगणा आहे. नृत्यांगणा असण्याबरोबरच धनश्री एक अभिनेत्री आहे आणि लवकरच ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिल राजू यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे.