Isha Deol Talks About Hema Malini & Dharmendra : अभिनेत्री हेमा मालिनी व अभिनेते धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. आजवर त्यांनी अनेक विविध चित्रपटांतून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा अनेकांना आवडली. अशातच आता त्यांची लेक ईशा देओलने आई-वडिलांमधील नात्याबद्दल सांगितलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे पंजाबी आहेत तर हेमा मालिनी या मूळच्या दक्षिण भारतातून आहेत. परंतु, त्यांच्या घरी दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीला अधिक पसंती असल्याचं ईशाने सांगितलं आहे. ईशाने ‘टाईम्स ऑफ इंडिया’सह संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने लहानपणापासून तिच्या घरी दाक्षिणात्य पद्धतीचं जेवण बनत आलं आहे आणि तिला इडली-सांबार, डोसा चटणी, दही भात हे पदार्थ खायला खूप आवडतात, असं सांगितलं आहे.
ईशा देओलने केलं वडील धर्मेंद्र यांचं कौतुक
ईशाने पुढे तिच्या मुलीसुद्धा आता तिला अनेकदा इडली सांबार आणि चटणी बनवायला सागंतात, त्यांना ते खूप आवडतं असं म्हटलं आहे. ईशाने पुढे तिचे वडील धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “माझे बाबा माझ्या आईच्या आवडी-निवडींचा खूप आदर करतात, त्यामुळे जेव्हा ते आईबरोबर असतात तेव्हा ते मांसाहार करत नाहीत. पण, जेव्हाही आम्ही सगळे कुठे बाहेर प्रवास करत असतो तेव्हा ते मांसाहार करतात. पण, जर आई तिथे असेल तर ते दुसऱ्या रूममध्ये जाऊन खातात, जेणेकरून तिला त्याचा वास येणार नाही, कारण आईला वासही सहन होत नाही.”
याच मुलाखतीत ईशाने तिच्या आईच्या जेवणाच्या आवडी-निवडींबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणाली की, हेमा मालिनी आता ग्लूटन फ्री पदार्थ खातात, कारण त्याचे अनेक फायदे असतात; विशेष करून ७० वगैरे वय असलेल्या लोकांसाठी. पूर्वी त्या सर्व पदार्थ खायच्या पण आता फक्त ग्लूटन फ्री पदार्थांचंच सेवन करतात.
ईशा देओलबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘रुद्र’ या वेब सीरिजमधून झळकलेली. यामध्ये तिने अजय दवगणबरोबर काम केलेलं. त्यानंतर ती ‘हंटर’मध्ये सुनील शेट्टींबरोबर पाहायला मिळालेली.