Dimple Kapadia and Hema Malini: राजेश खन्ना हे त्यांच्या पिढीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. पण, ते त्यांच्या सहकलाकारांना योग्य वागणूक देत नसत. ते अंहकारी होते. ते तासनतास शूटिंग थांबवत असत. त्याचा अनेक कलाकारांना त्रास होत असे. अभिनेत्री हेमा मालिनी यांनादेखील राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करताना त्रास झाला. हेमा मालिनी त्या काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या.

“राजेश खन्ना अहंकारी…”

हेमा मालिनी व राजेश खन्ना यांच्यात मतेभद असूनही त्यांनी १३ चित्रपट एकत्र केले. याचे कारण म्हणजे हेमा मालिनी यांची डिंपल कपाडिया यांच्याशी असलेली मैत्री हे होते. त्यावेळी डिंपल कपाडिया व राजेश खन्ना यांचे नुकतेच लग्न झाले होते. जेव्हा डिंपल हेमा मालिनींना भेटल्या त्यावेळी डिंपल किशोरवयीन होत्या. हेमा मालिनी त्यांच्यापेक्षा ९ वर्षांनी मोठ्या होत्या. दोघीही त्यावेळी त्यांच्या खासगी आयुष्यात संघर्ष करत होत्या. त्यामुळे त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली.

राम कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनी यांचे आत्मचरित्र लिहिले. ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ असे या आत्मचरित्राचे नाव आहे. यामध्ये हेमा मालिनी यांनी एक आठवण सांगितली. त्यांनी सांगितले की राजेश खन्ना त्यांच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने वागत असत. त्यामुळे त्या त्यांच्याकडे लक्ष देत नसत. त्यांना राजेश खन्ना अहंकारी वाटायचे. तसेच, राजेश खन्नांनादेखील त्या अहंकारी वाटायच्या. पण, याच काळात हेमा मालिनी यांची राजेश खन्नांबरोबर शूटिंगला येणाऱ्या त्यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांच्याशी ओळख झाली.त्यांची खूप चांगली मैत्री झाली.

“त्या लहान मुलीने तिची…”

डिंपल कपाडिया जेव्हा फक्त १६ वर्षांच्या तेव्हा त्यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्नगाठ बांधली. राजेश खन्ना त्यावेळी ३२ वर्षांचे होते. या लग्नात अगदी सुरुवातीपासूनच काही ना काही अडचणी होत्या. हेमा मालिनींना याबाबत सर्वकाही माहित होते.हा काळ हेमा मालिनी यांच्यासाठीसुद्धा आव्हानात्मक होता. त्या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळी धर्मेंद्र यांचे आधीच लग्न झाले होते. त्यांना चार मुले होती.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात डिंपल कपाडिया यांच्याबाबत लिहिले, “ती माझ्या लहान बहिणीप्रमाणेच होती. त्या लहान मुलीने तिची मोठी साडी स्वत:भोवती गुंडाळली होती. हातात बांगड्या घातल्या होत्या. तिला लवकरच बाळही झाले.”

डिंपल यांच्या एकटेपणाबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, “जेव्हा आऊटडोअर शूटिंग असायचे तेव्हा ती तिथे दारु पित असे किंवा धूम्रपान करत असे. पण, मला कधीच ते चुकीचे वाटले नाही. मला माहित होते की ती खूप काळजीत होती. ती एकटी पडली होती.”

“राजेश खन्ना दिवसभर शूट करत असत आणि संध्याकाळी मित्रांबरोबर बसत असत. रात्री तो दारू पित असत. तिला कोणीही साथीदार नव्हते.मला वाटते की डिंपलला कौटुंबिक वातावरण आवडत असे. त्यामुळे ती माझ्याबरोबर माझ्या पालकांबरोबर अनेकदा वेळ घालवत असे. माझ्या आयुष्यातसुद्धा त्यावेळी खूप गोष्टी चालू होत्या. मोठी उलथापालथ होत होती. त्या सर्व गोष्टी मी तिच्याबरोबर बोलत असे. तिच्याबरोबर चर्चा करत असे. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. पण, तिचे झाले होते. त्यामुळे काही गोष्टींबाबत ती मला सल्ला देत असे.”

दुसरीकडे, डिंपलसुद्धा अनेक अडचणींचा सामना करत होत्या. त्यांनी तरुण वयात एका सुपरस्टारबरोबर लग्न केले होते. बॉबी या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला होता. तरीही त्यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणे सोडले होते. त्या कमी वयात आई झाल्या. त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या. पण हेमा मालिनी यांच्याबरोबर त्यांची उत्तम मैत्री होती.

“हा माणूस तुझ्याशी कधीच…”

याच पुस्तकात डिंपल कपाडिया यांनी आठवण सांगितली की धर्मेंद्र कधीही हेमा यांच्याशी लग्न करणार नाहीत, असा त्यांना कधीच विश्वास होता. डिंपल म्हणालेल्या, “मला वाटत नव्हते की धर्मेंद्रा हेमाशी लग्न करतील. मी हेमाला सांगितले होते की हा माणूस तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. तू यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. तू यावर विचार केला पाहिजे.”

दरम्यान, हेमा मालिनी व धर्मेंद्रा यांनी १९८० साली लग्न केले.