Bollywood Actress on Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटातील विकी कौशल, अक्षय खन्ना या कलाकारांच्या कामाचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं. पण, तरीही या चित्रपटाबद्दल काहींच्या संमिश्र प्रतिक्रियाही होत्या. अशातच या चित्रपटातील अभिनेत्री डायना पेंटीने याबद्दल तिचं मत मांडलं आहे. तसेच तिनं ‘छावा’मधील तिच्या भूमिकेबद्दलही सांगितलं आहे. डायनाने ‘छावा’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटात डायना पेंटीनं औरंगजेबाच्या मुलीची झीनतची भूमिका साकारली होती. ‘छावा’बद्दल बोलताना डायना म्हणाली, “प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असतात. काहींना चित्रपट आवडतो, काहींना आवडत नाही. मी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतेय म्हणून मला तो आवडलाच असेल, असं काही नसतं. पण याचा अर्थ असाही होत नाही की, तो चित्रपट चांगला नसेल”.

डायना पुढे म्हणाली, “कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी दोन्ही पैलू तितकेच महत्त्वाचे असतात. कारण- यामुळे ते पुढची कलाकृती अजून चांगल्या पद्धतीने तयार करतात. मी जेव्हा माझा एखादा चित्रपट बघत असते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की, मी अजून छान काम करू शकले असते. मी माझ्या कामावर खूप टीका करते”.

‘छावा’ चित्रपटातील भूमिकेबद्दल डायना म्हणाली, “मला या भूमिकेबद्दल ही गोष्ट आवडली की, माझी भूमिका खूप छोटी होती आणि त्यामुळे माझ्यासाठी ती जास्त आव्हानात्मक होती. ती भूमिका साकारणं इतकं सोप नव्हतं. यापूर्वी मी अशी भूमिका कधीही साकारली नव्हती. त्यामुळे मी त्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघते”. अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी स्वत:ला भाग्यवान समजते की, मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, ज्यामधून आपला इतिहास दाखवला गेला. इतिहासाच्या दृष्टिकोनातून ही खूप उत्कृष्ट कथा होती. मला लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबरही काम करायचं होतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री डायना पेंटीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आणि स्वत:ची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली आहे. डायनानं ‘कॉकटेल’, ‘हॅपी भाग जायेगी’, ‘परमाणू’, ‘ब्लडी डॅडी’, ‘छावा’ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.