Anupam Kher Recalls Shooting Experience With Dilip Kumar : अनुपम खेर हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. सध्या ते त्यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनुपम खेर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिलीप कुमार यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
अनुपम यांनी दिलीप कुमार यांच्यासह ‘कर्मा’ चित्रपटात काम केलं होतं. यातील त्यांचा एक सीन त्याकाळी प्रचंड गाजला होता. सुभाष घई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात दिलीप कुमार अनुपम यांच्या कानाखाली मारतात व तेव्हा “इस थप्पड की गुंज अब तुम्हे सुनाइ देगी” असं म्हणतात. त्यावेळचा त्यांचा हा संवाद खूप गाजला होता.
अनुपम यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. ते दिलीप कुमार यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगताना त्यांना किंग म्हणाले आहेत. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “दिलीप कुमार एक किंग होते. ‘कर्मा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मी सकाळी ७ वाजता तयार होतो”.
अनुपम यांनी याबाबत पुढे दिलीप कुमार सेटवर कसे असायचे याबाबत सांगितलं आहे. अभिनेते म्हणाले, “सेटवर ते ११ च्या सुमारास आले होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या मर्सडीजमधून उतरताना एका राजासारखे वाटत होते. नंतर त्यांनी चहा मागवला तेव्हा त्यांना चांदीच्या किटलीतून चहा देण्यात आला. त्याचबरोबर त्यांना बिस्किटेही देण्यात आली. जेव्हा त्यांची न्याहारी संपली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती.”
“दिलीप कुमार यांच्यासह काम करण्यासाठी मी उत्सुक होतो, म्हणून मी त्यांची वाट पाहात होतो. जेवणानंतर ते म्हणाले की, त्यांना आराम करायचा आहे. त्यादरम्यान आम्ही चित्रपटातील इतर सीनचं शूटिंग केलं. नंतर त्यांनी ३:३० वाजता आज नको काम करुयात, उद्या करता येईल असं सांगितलं. ते ज्या प्रकारे सांगायचे, बोलायचे त्यानंतर त्यांना नाही म्हणणं कठीण जायचं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत ६० चित्रपटांमध्येच काम केलं आहे. मी ४० वर्षांच्या कारकिर्दीत ५४५ चित्रपट केले आहेत, पण ते किंग होते.”